रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:07 AM2019-03-17T00:07:43+5:302019-03-17T00:08:29+5:30

खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली.

Due to employment deficit, the crisis of starvation on 25 families | रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

Next
ठळक मुद्देखडकी मंदिरासमोरील दुकाने हटविली : संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली. परंतु, शासनाने त्यांना देऊ केलेला मोबदला जमीनमालकाच्या खोटारडेपणामुळे मिळण्यास विलंब होत असल्याने दुसरीकडे कुठे व्यवसाय उभा करायचा व त्याकरिता लागणारे भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न या लघु व्यावसायिकांना भेडसावत आहे. या सर्व हॉटेल व्यवसायिकांचा रोजगार हिरावण्यापूर्वी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांना जागा उपलब्ध करुन द्यायची होती. परंतु, असे झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सुमारे ४० वर्षापासून मोहम्मद मुमताज हबीब अन्सारी, जमील खान मोहम्मद युसूफ, गजानन रामाजी राऊत, ताहिर अली इनायत अली, मोहम्मद शकील खाान आदी व्यावसायिक किरायाच्या जागेवर हॉटेलचे शेड उभारून व्यवसाय करीत होते. मात्र, जागामालकाने ही सर्व दुकाने स्वत:चीच असल्याचे भासवून दुकानमालकाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम स्वत:च हडपण्याचा डाव आखला होता. याची कुणकुण या व्यावसायिकांना लागताच यावर शासनाकडे आक्षेप घेतला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नुकसान भरपाईचा मोबदला प्रलंबित आहे. जमीनमालकाने त्याच्या जागेवर असलेली वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने स्वत:चीच असल्याचे भासविण्याकरिता खडकीचा ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर केल्याचा आरोप या सर्व व्यावसायिकांनी केला आहे. तसेच सेलूच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी चुकीचे मूल्यांकन केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केला आहे. या हॉटेलसोबत तेथील सिरादिननिसा इकबाल खान, शमसुनिसा इकबाल खान व शरफुनिसा शेख उस्मान यांची घरेसुद्धा या महामार्गात जात आहेत. त्यांचाही मोबदला अडकल्याचे सांगण्यात आले.
शेतीचा वाढीव मोबदलाही मिळाला नाही
महामार्गात गेलेल्या शेतात आंब्याची झाडे होती तसेच ओलिताची शेती कोरडवाहू दाखविण्यात आली होती. यात शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, त्याचा शासनाकडून अद्याप वाढीव मोबदला देण्यात आल्या नसल्याचा आरोप मुजाहिद आणि मोहम्मद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

जमीन मालकाने पटवारी व ग्रामसेवक यांना हाताशी घेऊन व चिरीमिरीच्या मोहात बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आमच्या मालकीचे हॉटेल, दुकान स्वत:चे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली. आम्हाला मिळणारा हक्काचा नुकसानीच्या मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी.
- इकबाल खान, किरकोळ व्यावसायिक, खडकी (आ.)

Web Title: Due to employment deficit, the crisis of starvation on 25 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.