लिंक फेलमुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प
By admin | Published: May 25, 2015 02:14 AM2015-05-25T02:14:26+5:302015-05-25T02:14:26+5:30
स्थानिक बॅँक आॅफ इंडिया शाखेची लिंक फेल असल्याने गुरूवारपासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.
रोहणा : स्थानिक बॅँक आॅफ इंडिया शाखेची लिंक फेल असल्याने गुरूवारपासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. भर उन्हात ग्राहक लिंक येईल म्हणून दररोज चकरा मारत आहेत; पण त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे दिसते. बॅँक प्रशासनाने ग्राहकांना बसण्याची बाक तर सोडाच; पण पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नाही. यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.
शेतकऱ्यांची वर्धा जिल्हा सहकारी बॅँक व्यावहारिक दृष्ट्या बंद आहे. यामुळे रोहणा व परिसरातील २०-२१ गावांतील २५ हजार ग्राहकांना बॅँक आॅफ इंडिया शाखा रोहणा ही एकमेव बॅँक आहे. सदर बॅँकेची लिंक बीएसएनएल या राष्ट्रीय चॅनेलच्या सेवेशी जोडली आहे. राष्ट्रीय चॅनेल असले तरी बीएसएनएलची सेवा अत्यंत बेभरवशाची आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. बीएसएनएलची सेवा कधी बंद पडेल व किती दिवस बंद राहील, हे सांगणे कठीण आहे. सदर सेवा बंद पडली की, बॅँकेतील लिंक फेल होते. परिणामी, बॅँकेतील आर्थिक व्यवहार ठप्प होतात. व्यवहार ठप्प होणे व एक-दोन दिवसांत पुन्हा सुरू होणे, हा नित्यक्रम गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ग्राहक नाराजी व्यक्त करतात; पण बॅँक प्रशासन यात सुधारणा करायला तयार नाही. अधिकारी लिंक फेल आहे, असा फलक लावण्यातच धन्यता मानतात.
गुरूवारी पुन्हा बॅँकेतील लिंक फेल झाली. २१ ते २३ तब्बल तीन दिवस लिंक सुरू झाली नाही. रविवारी बॅँक बंद होती. यामुळे चार दिवस आर्थिक व्यवहार ठप्प होते. दरम्यान, ग्राहकांची गर्दी होती. सूर्य आग ओकत असताना बॅँक प्रशासनाने सावलीत बसण्याची व पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नाही. यामुळे ग्राहकांत असंतोष पसरला आहे. बॅँक सुरू झाली तेव्हा हीच शाखा समाजसेवेवर काही निधी खर्च करीत होती; पण आता ग्राहकांचाही विसर पडल्याचेच दिसते.(वार्ताहर)