वाघाच्या भीतीने गोपालकांचे गावातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:19 PM2018-03-31T23:19:24+5:302018-03-31T23:19:24+5:30
शेतात बांधून असलेल्या गायीचा रात्री फडशा पाडल्याने भयग्रस्त ग्रामस्थांनी गावातून पलायन करणे सुरू केले आहे. वाघ उसंत घेत नाही. वनविभाग दिलासा देत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : शेतात बांधून असलेल्या गायीचा रात्री फडशा पाडल्याने भयग्रस्त ग्रामस्थांनी गावातून पलायन करणे सुरू केले आहे. वाघ उसंत घेत नाही. वनविभाग दिलासा देत नाही. यामुळे शेतकरी, गोपालकाला कुणी वाली नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
मागील एक महिन्यापासून सुसूंद गावात वाघाने बस्तान बांधले आहे. तो तिथून हलायला तयार नसून आजपर्यंत पाच शेळ्या, दोन गोन्हे वाघाच्या भक्ष्यस्थानी सापडले. सध्या उन्हाळा असल्याने गोपालक शेतात गुरे बांधतात. गुणवंत वैद्य यांनीही म्हशी व गायी शेतात बांधल्या होत्या. रात्री १२ वाजताच्या सुमारास वाघाने गाय उचलून नेली. ती गाय गवळाऊ असून सहा महिन्याची गरोदर होती. वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ हळुहळु गावातून पलायन करीत आहे. गायी व म्हशी घेऊन गोपालक गाव सोडून जात आहे. काही दिवसांत गाव ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे.