महालक्ष्मीच्या आगमनावर जीएसटीमुळे महागाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:20 PM2017-08-28T22:20:38+5:302017-08-28T22:21:16+5:30
गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीची स्थापना होणार आहे. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते.
श्रेया केने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीची स्थापना होणार आहे. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते. गौरींचा थाटमाट मोठा असल्याने आकर्षक आरास, पंचपक्वान, भरजरी वस्त्रे आणि दागिणे असा साज असतो. स्थानिक बाजारपेठेत खरेदीकरिता लगबग दिसून आली. यंदा जीएसटीमुळे प्रत्येक वस्तूंचे दर वाढलेले दिसून आले.
यात महालक्ष्मीचे मुखवटे साधारण २०० ते ३०० रूपयांनी महाग झाले असून दागिण्यांची भाववाढ झाली आहे. असे असले तरी बाजारात विक्रीकरिता असलेल्या आकर्षक दागिण्यांच्या मागणीत वाढ आहे. मोत्यांचा सूबक दागिण्यांना विशेष पसंती आहे. यासह पूजा साहित्याचे दर वाढलेले आहे.
महालक्ष्मी पुजनाकरिता धातूचे तसेच काच आणि स्टोनवर्कचे तबक, तोरण, माळ, प्लास्टिक फुलांचे हार, सजावट आणि मंडपाकरिता लागणारे साहित्य यंदा ५० ते १०० रुपयांनी वाढले आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीमुळे झालेल्या भाववाढीचा परिणाम विक्रीवर जाणवत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी यावेळी लोकमत सोबत बोलताना सांगितले.
पितळी धातुपासून निर्मित साहित्याची गर्दी
पितळी धातूपासून निर्मित पुजासाहित्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पितळीच्या वस्तूंना पुजेत विशेष मान आहे. त्यामुळे कदाचित वस्तूंची विक्री वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बाजारातही महालक्ष्मी पुजनानिमित्त विशिष्ट आकारातील नंदादीप, पुजेची थाळी, समई, तबक, आदी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत.
मातीचे मुखवटे अकोला आणि अमरावती येथून विक्रीसाठी येतात. यंदा मातीचे मुखवटे एक हजार ते १५०० पर्यंत आहे. यातही २०० ते ३०० रूपयांची सरसकट वाढ झाली आहे. मुखवटे तयार करताना लागणाºया वस्तंूवर जीएसटी लागल्यामुळे ही दरवाढ झाली आहे.
महालक्ष्मीचे मातीशिवाय धातुपासून निर्मित मुखवटे सुद्धा मिळतात. हे मुखवटे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून आणले जातात. या मुखवट्यांना वाढती मागणी असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी धातूपासून निर्मित मुखवटे असायचे. मात्र असे मुखवटे मिळेनासे झाल्याने मातीचेच मुखवटे दिसून येते. कालबाह्य होत असलेले पितळी मुखवटे पुन्हा नव्या स्वरूपात बाजारात विक्रीसाठी आले आहे. या मुखवट्यांची किंमत ३,५०० ते ४ हजार पर्यंत आहे.