जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर-दहेगाव रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:50 PM2018-08-10T23:50:31+5:302018-08-10T23:51:05+5:30
बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. त्यामुळे या मार्गावरून अवागमन करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दोन वर्षापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण होऊन रस्ता गुळगुळीत झाला होता. परंतु बुट्टीबोरी ते तुळजापूर रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे टिप्पर, ट्रक या मार्गावरून जात निर्माणाधिन सिमेंट मार्गाकरिता लागणारी गिट्टी तयार करण्याकरिता मोठे दगडे व मुरूमाची दहेगाव (गोसावी) येथून ने-आण करण्यात येते. दिवसाला या मार्गावरून जड वाहनांच्या याकरिता शेकडो फेºया होत असल्याने मार्गाची अक्षरश चाळणी होवून रस्ता उखडून त्यातील गिट्टी रस्त्यावर विखुरल्या गेली आहे. त्यामुळे दहेगाव व त्या पलीकडील चार ते पाच गावातील गावकºयांना केळझरकडे येतांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनचालकांना या मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी होणारे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे. केळझर ते दहेगाव (गोसावी) हे अंतर सहा कि.मी. असून बाजारपेठ आणि बॅँकेचे व्यवहार, विद्युत वितरण कंपनीशी निगडीत कामे केळझर येथूनच दहेगाव (गोसावी) सह पहेलानपूर, खापरी (ढोणे), आलगाव, जुनोना, आजनगाव आदी गावातील नागरिकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांचे केळझरला येणे नित्याचेच होते. परंतु सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दुचाकी, आॅटोरिक्षासह लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून अवागमन करताना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तरी बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत दोषींवर कारवाई करावी व या मार्गाची दुरुस्ती करावी.
रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यता
रसुलाबाद- रसूलाबाद ते विरुळ (आ) या दोन्ही गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रसूलाबाद ते विरुळ दरम्यान जोडणाऱ्या मार्गावर येथील शेतकरी सुरेश ढोके यांच्या शेताजवळील मार्गाच्या मोठ्या प्रमाणात कडा खचल्याने अपघात होऊ शकतो. या ठिकाणी काही अंतरावर सीमेंट नळी (पायली ) टाकलेली आहे त्या ठिकाणी पुल आहे पण पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी काडी कचरा अडकून बुजतात आणि पाणी बाजूने फेकल्या जाते त्यामुळे त्याठिकाणी खोलगट भाग निर्माण झाला. या बाबतची माहिती लोकप्रतिनिधीला दिली ते पण दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे.