महामार्गामुळे तीन तालुक्यात आली ‘समृद्धी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:43 PM2019-03-07T23:43:36+5:302019-03-07T23:43:53+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाले असून त्याचे जीवनमानही उंचावले आहे.
रस्ते, महामार्ग या विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. त्यामुळे शासनाने रस्ते व महामार्ग निर्मितीवर भर दिला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातून जात असल्याने या तिन्ही तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची ५७९.४६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यापैकी ७७३ शेतकऱ्यांनी संपादनाकरिता संमती दर्शविली आहे. शासनाने आतापर्यंत ७३५ शेतकऱ्यांकडून ४९८.८१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित १४१ शेतकऱ्यांची ८०.६४ हेक्टर जमीन संपादित करणे शिल्लक आहे. तिन्ही तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांना शासनाने ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान पालटले असून इतरही शेतकऱ्यांच्या शेतीला सोन्यापेक्षाही झळाळी आली आहे. परिणामी, महामार्गाने नावाप्रमाणेचे शेतकऱ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे.
सेलू तालुका कोट्यधीशांचा
समृद्धी महामार्गाकरिता वर्धा, आर्वी व सेलू या तिन्ही तालुक्यांपैकी सेलू तालुक्यातील सर्वाधिक जमीन खरेदी करण्यात आली. सेलू तालुक्यातील शेतीही सुपीक व बागायती असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मोबदला मिळाला आहे. वर्धा तालुक्यातील २९२ शेतकऱ्यांपैकी २७१ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असून त्यापैकी २३९ शेतकऱ्यांची १७५.६२२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. आर्वी तालुक्यातील १८५ शेतकऱ्यांपैकी १६५ शेतकऱ्यांकडून १०१. ६१ हेक्टर जमीन संपादित केली आहे, तर सेलू तालुक्यातील ३९९ शेतकऱ्यांपैकी ३३९ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने आतापर्यंत ३३१ शेतकऱ्यांकडून २२१.५८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली आहे. याचा मोबदला म्हणून या शेतकºयांना २०७ कोटी ७० लाख ०८ हजार ३६० रुपये देण्यात आले आहे. हा मोबदला दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
३४ गावांतील शेतकऱ्यांचा वाढला बँक बॅलन्स
वर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी (मेघे),पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली व लोणसावळी तर आर्वी तालुक्यातील बोरी, माणकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरुळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव आणि सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.),धोंडगाव, आमगाव(ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे) या ३४ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. दरवर्षी बँक खात्यात राहणारा ठणठणाट आता दूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात मोठी रक्कम आल्याने शेतकऱ्यांनी त्याची गुंतवणूक करीत दुसरी शेती घेण्यासोबतच लहान-मोठा व्यवसायही सुरू केला. काहींनी उद्योग उभारला. तसेच मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम व मुला-मुलींच्या विवाहाची तडजोड करून ठेवली आहे. तर काहींनी वाहने खरेदीसह ऐशोआरामावर भर दिल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.