कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे जलयुक्तमध्ये पाचच गावे
By admin | Published: April 27, 2017 12:39 AM2017-04-27T00:39:04+5:302017-04-27T00:39:04+5:30
कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला.
एसडीओंचीही नाराजी : नियोजनाचा अभाव
आष्टी (श.) : कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला. यामुळे ३६ ग्रामपंचायतींना वंचित राहावे लागले. याचा निषेध नोंदवित सरपंचांनी कृषी विभागाला विकासाशी देणे-घेणे नसल्याचा आरोप केला आहे. नियोजनाच्या अभावामुळे निधी मिळाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या आढावा सभेत एसडीओ शर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली.
जलयुक्त शिवार अभियानमधून शेताच्या काठावर नाला खोलीकरण बंधारा बांधकाम, गाळ काढणे, बांध-बंधिस्ती, तलाव यासह अनेक कामे करण्यासाठी निधीची तरतूद आहे; पण त्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेऊन कामे समाविष्ट करावी लागतात. कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात ग्रामसभा घेण्याचे धाडस दाखविले नाही. परिणामी, शासनाच्या योजनांपासून मुकावे लागले आहे. आष्टी तालुक्याला प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पॅकेजमधून बऱ्याच योजना मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांना सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्या मागील उद्देश होता. त्यावेळी अधिकारी सक्रीय होते. आताही अधिकाऱ्यांवरच जलयुक्त शिवार योजना अलवंबून आहे; पण दुर्लक्षित धोरणाचा फटका बसत आहे. तालुक्याला नियमित तालुका, मंडळ कृषी अधिकारी नसून कृषी सहायकाची पदे रिक्त आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेठकर यांनी कामाचा अधिक भार असल्याने योजना राबविण्यात मागे असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. जिल्हास्तरावरून अधिकारी सभा घेण्यासाठी वारंवार बोलवित असल्याने कामांकडे लक्ष नसल्याचेही सांगितले.
विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. एसडीओ शर्मा यांनी केवळ पाच गावांना समाविष्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी सक्रीय राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी तरी अर्ध्याधिक गावांना समाविष्ट करून न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)