जखमी रोह्याचा उपचाराअभावी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:53 PM2019-07-17T21:53:32+5:302019-07-17T21:53:50+5:30
पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली.
पाण्याचे सर्वत्रच दुर्भिक्ष्य असल्याने याचा फटका आता मानवासह जनवारांनाही सहन करावा लागत आहे. जंगलात पाण्याची सोय नसल्याने जंगली जनावरांनी पाण्याकरिता गावाकडे धाव घेतली आहे. असाच एक रोही पाण्याच्या शोधात आदर्शनगरात आला. रोह्याला पाहताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.
कुत्र्यांपासून आपला जीव वाचविण्याकरिता सुसाट पळत सुटलेला हा रोही नंदू वाळके यांच्या घराच्या आवारात शिरला. तेथे नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने कुत्रे आणि नागरिकांची गर्दी पाहून तो चांगलाच घाबरला. रोह्याच्या डाव्या कानाला मार लागल्याने दीपक भोंगाडे यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनरक्षक बि.एम.इंगळे आणि मजरे हे तीन वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले.
तसेच पिपल फॉर अॅनिमल्सचे कौस्तुभ गावंडेही आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झाले.पण, तोपर्यंत उपचाराअभावी रोह्याचा मृत्यू झाला. तीन ते चार वर्षाची मादी असल्याचे वनविभागाने सांगितले. वनरक्षकांनी पंचनामा करुन मृत रोह्याला ताब्यात घेतले.
आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास रोही घाबरलेल्या अवस्थेत आवारात शिरला. त्याच्या मागे परिसरातील कुत्र्येही दिसून आले. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्याला पिण्याकरिता पाणी ठेवले आणि वनविभागाला संपर्क केला. पण, वनविभागाचे कर्मचारी उशिरा पोहोचल्याने जखमी रोह्याला वेळीच उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
- दीपक भोंगाडे, आदर्शनगर.