जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे
By admin | Published: September 7, 2015 02:09 AM2015-09-07T02:09:45+5:302015-09-07T02:09:45+5:30
राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे.
शेतातील माती टाकली बांधावर : खड्डे पडल्यामुळे शेतात साचते पाणी; शेती राहिली पडिक
विरूळ (आकाजी) : राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या पाणी साचत असल्याने शेताला तलावांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.
आर्वी तालुका कृषी विभागाने परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविले. यात शेतातील बांध, नाला खोलीकरण व बांध आदी कामे जेसीबीद्वारे केली; पण नियोजन नसल्याने अनेकांच्या शेतांचे नुकसान झाले. परिणामी, शेती पडिक राहिली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी लीला सहदेव यांची मौजा विरूळ येथे पाच ते सहा एकर शेती आहे. या शेतात कुणालाही न विचारता कृषी विभागाने शेतातील बांध जेसीबीने खोदला. शेतातील माती खोदून धुऱ्यावर टाकली. यामुळे शेतात खड्डे पडले. परिणामी, पाऊस आल्यास शेताला तलावाचे स्वरूप येते. शेतात पाणी साचल्याने यंदा पेरणी करता आली नाही व शेती पडिक राहिली.
याबाबत त्यांनी कृषी सहायक राठोड व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण कुठलेही उत्तर मिळाले नाही. शेताच्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून लीला सहदेव व कुटुंबीय शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)