जलयुक्त शिवार योजनेमुळे उमरगावचे झाले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:25 PM2017-11-07T23:25:19+5:302017-11-07T23:25:31+5:30
जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले.
कपिल जयस्वाल।
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या अभियानातून उमरगावचे नंदनवनच झाले आहे. नदीला पाणी असून नालेही तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतकरी तथा ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी स्थानिक संस्था तथा शासकीय यंत्रणेमार्फत लाखो रुपये खर्च करून नदी, नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून त्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यातून पाणी अडविणे व जीरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब शेतीकरिता फलदायी ठरू लागली आहे. उमरगाव परिसरात मागील वर्षी लघुसिंचन विभाग जि.प. वर्धा यांच्यामार्फत लाखो रुपये खर्च करून पंचधारा नदीवर नव्याने सिमेंट बंधारे निर्माण करण्यात आले. नदी पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले. या बंधाºयामध्ये साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकºयांची सुमारे ५० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन काही शेतकºयांची शेती पडिक राहत होती; पण आता या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पडिक शेती वहिवाटीखाली आली आहे. जलयुक्तमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे शेतकरी लघुसिंचन विभागाप्रती समाधान व्यक्त करीत आहे. लघुसिंचन विभागाने केलेल्या कामाचा दर्जा चांगला असल्याचे दिसून येते. शेतकºयांच्या शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली आहे. या कामापासून शेतकºयांना त्रास होणार नाही, याची दक्षताही लघुसिंचन विभागाने घेतली आहे. विशेषत: शेतकºयांनी प्रत्यक्ष हजर राहून कामे करून घेतल्याने जलयुक्तचा लाभ दृष्टीस पडत आहे.
अधिकाºयांच्या सूचनेवरून उमरगाव परिसरातील कामांची पाहणी दररोज शेतकरी करीत होते. काही ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट पायली व बंधाºयाच्या दोन्ही बाजूने दगडाची पिचींग करण्यात आलेली नाही. यामुळे बंधाºयाच्या दोन्ही कडा वाहून गेल्यात. यातून चांगल्या कामाला डाग लावण्याचे कामच कंत्राटदाराने केल्याचे दिसते. लघुसिंचन विभगाने काम पूर्ण करून घेण्याची मागणी आहे.
नदी, नाल्यांचे झाले पुनरूज्जीवन, विहिरींच्या पातळीत वाढ
सेलू तालुक्यातील उमरगाव परिसरात जि.प. लघु सिंचन विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. या कामांमुळे नदी, नाल्यांचे पुनरूज्जीवन झाले असून शेतातील तथा गावालगतच्या विहिरीची पाणी पातळी वाढल्याचे दिसून येत आहे.
नदी तथा नाल्यांच्या पात्रामध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने सध्या पाणी साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याचाही सिंचनासाठी वापर करणे शक्य झाले आहे. जलयुक्तच्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.