कार्लेकरांच्या बंडाळीने देशमुख व कांंबळे गटात दरी
By admin | Published: July 7, 2016 02:12 AM2016-07-07T02:12:08+5:302016-07-07T02:12:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती
अविश्वासाच्या हालचाली : बाजार समिती निवडणुकीचे पडसाद
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठीचे आपले नामांकन कायम ठेवले. यात ते निवडून आले. परिणामी, सुरेश देशमुख व आ. रणजीत कांबळे गटात दरी निर्माण झाली आहे. देशमुख गट म्हणतो, रणजीत कांबळे गटाने आघाडी धर्म पाळला नाही, तर कांबळे गट म्हणतो, देशमुख गटच फुटला. यावरून आता दोन्ही गटात बेबनाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.
कुणी विश्वासघात केला, कुणी आघाडी धर्म पाळला नाही, हे सिद्ध करण्यासाठी सत्तेसाठी आघाडीत बंडखोरी करून सभापतिपदी विराजमान झालेले श्याम कार्लेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा, यासाठी राष्ट्रवादी सदस्यांकडून गट प्रमुख सुरेश देशमुख यांना साकडे घालणे सुरू आहे. या दृष्टीने देशमुख गटाने हालचालीही सुरू केलेल्या आहेत. यासाठी रणजीत कांबळे गटाची भूमिका काय राहिल, यावरच सभापतिपदाच्या निवडणुकीत काय घडले, यावरुन पडदा उठणार असल्याचे बोलले जात आहे.
सुरेश देशमुख आणि आ. रणजित कांबळे यांच्या पुढाकारात सहकार गटाची निर्मिती झाली. सभापती पदाच्या निवडणुकीत कांबळे गट आपण प्रामाणिक राहुन सहकार गटाच्या रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगत आहे. परंतु बंडखोर कार्लेकर निवडून आले. देशमुख गटाने कार्लेकर यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचालीही सुरू केलेल्या आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. रणजित कांबळे गटाचे पाच संचालक आहे. हे पाचही संचालक आघाडीत ठरल्याप्रमाणेच रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगतानाच राष्ट्रवादीच्याच सदस्यांवर दगाबाजीचे खापर फोडत आहे. मात्र राष्ट्रवादीचे संचालक हा आरोप फेटाळत आहे. सुरेश देशमुख यांनी संचालकांवर टाकलेल्या अतिविश्वासामुळे हा धोका झाला. आ. कांबळे गटाच्या सदस्यांनीच खंडागळे यांना मतदान केले नाही, असा गंभीर आरोपही लावला जात आहे. या एकंदर घडामोडींमुळे देशमुख आणि कांबळे गट अप्रत्यक्षरित्या आमने-सामने आले आहे. या सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात. जनतेसमोर सत्य यावे, यासाठी श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणावा, खरे-खोटे काय ते निकालात निघेल, असे सहकार गटातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरेश देशमुख यांना साकडे घातले आहे. देशमुख यांनीही ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ म्हणून या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
कार्लेकरांचे सभापतिपद अल्पावधित अविश्वासाच्या गर्तेत
अविश्वासासाठी १२ सदस्यांची गरज आहे. देशमुख गट सहा व आ. कांबळे गटाचे पाच असे ११ सदस्य होतात. अडते व व्यापारी गटातून दोनपैकी १ सदस्य मिळाला, तर अविश्वास पारीत होऊ शकतो, या दृष्टीने देशमुख गटाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आ. कांबळे गट देशमुख गटाचा आरोप खोटा ठरविण्यासाठी अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेते वा यातून आपला काढता पाय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.