समन्वयाअभावी मृतदेह तीन तास घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:38+5:30
मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांची होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील जाम येथील वाहनचालकाचा तापाने घरीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन व कोरोना चाचणी करुन मृतदेह शीतगृहात ठेवण्याची व्यवस्था समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नसल्याने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा विचार सुरु झाला. पण, समुद्रपूर की हिंगणघाट याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांंमध्ये एकमत होत नसल्याने तब्बल तीनतास मृतदेह घरातच पडून राहिला. अखेर समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात चाचणी व शवविच्छेदन करुन प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले.
बंडू गुलाब बागेश्वर (४७) रा. जाब असे मृताचे नाव आहे. हा व्यक्ती वाहनचालक असून त्याचे नेहमीच बाहेर जिल्ह्यात आणि राज्यातही जाणे-येणे सुरुच होते. गेल्या दहा दिवसापासून बंडू यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने ते घरीच आजारी होते.
मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांची होती. त्यानुसार जामचे सरपंच सचिन गावंडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलाविली. पण, पीपीई किट नसल्याने मृतदेह उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. सोबतच समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास अडचणी मृतदेह समुद्रपूरला न्यायचा की हिंगणघाटला याबाबत समन्वय नसल्याने बराच वेळ नागरिकांना ताटकळ करावी लागली. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशानुसार समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात स्वॅब नमुने घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. मृत कोरोना संशयीत असल्याने गावकऱ्यांसह नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रशासनोच अंत्यसंस्कार केले. यावेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र सुर्यवशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, तालुका वैदकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, पोलीस पाटील कवडू सोमलकर, सरपंच सचिन गावंडे, ग्रामसेवक धोटे, तलाठी उपस्थित होते.