दिशा नसल्याने विदर्भाची दशा झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 10:28 PM2017-12-07T22:28:17+5:302017-12-07T22:28:34+5:30
विदभार्तील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण, गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कुणी प्रयत्न केला नाही.
आॅनलाईन लोकमत
हिंगणघाट : विदभार्तील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण, गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. याचा परिणाम विदर्भातील जनता भोगत आहे. विदर्भ वेगळा होईपर्यंत ही समृद्धी परत येणार नाही, असे मत महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.
स्व. मोहित झोटिंग स्मृत्यर्थ हरिओम सभागृहात ‘स्वातंत्र्यानंतरचा विदर्भ, दशा आणि दिशा’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप, राजकीय विश्लेषक राम नेवले, प्रसिद्ध अभिनेत्री गीता अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य मधुकर झोटिंग, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा सुरेखा देशमुख, धर्मराज रेवतकर, राजेंद्र झोटिंग उपस्थित होते. परिसंवादात सहभागी वक्त्यांनी मते व्यक्त केली. अग्रवाल यांनी विदर्भाची दशा सांगणारी कविता सादर करून प्रभावीपणे मत मांडले. नेवले यांनी विदर्भावरील अन्यायाचे आकडे सादर केले. माजी आमदार चटप यांनी विदर्भाच्या आंदोलनाची दिशा स्पस्ट करून सांगताना अनेक दाखले दिले.
प्रास्ताविक गंगाधर मुटे यांनी, संचालन प्रा अभिजीत डाखोरे यांनी केले तर आभार मधुसूदन हरणे यांनी मानले. कार्यक्रमाला रामेश्वर बोके, प्रभाकर कोळसे, आशिष भोयर, गिरीधर काचोळे, सतीश चौधरी, छत्रपती भोयर, मनोहर ढगे, प्रदीप गिरडे, राजेंद्र कोंडावार आदींनी सहकार्य केले.