डॉक्टर नसल्याने ग्रामीण रुग्णालयच झाले आजारी
By admin | Published: October 13, 2014 11:25 PM2014-10-13T23:25:21+5:302014-10-13T23:25:21+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत़ वैद्यकीय अधिकारी नसल्यने रुग्णसेवा कोलमडली आहे़ असून तापाच्या साथीवर योग्य नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा नापास झाली आहे़
सेलू : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत़ वैद्यकीय अधिकारी नसल्यने रुग्णसेवा कोलमडली आहे़ असून तापाच्या साथीवर योग्य नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा नापास झाली आहे़ या प्रकारामुळे रुग्णांसह नातलगांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे़
स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी अनेक महिन्यांपासून प्रशिक्षणाच्या नावावर रजेवर आहेत़ कंत्राटी डॉक्टरांना २४ तास सेवेवर ठेवण्याचा पायंडा येथे पडला आहे़ २४ तास अविरत सेवा देण्यात खरोखर डॉक्टर समर्थ ठरत असतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ मागील आठवड्यात २४ तास सेवेवर असणारे डॉक्टर थोडे बाहेर गेले असता अचनाक रुग्णांसोबत आलेल्या नागरिकांनी डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ यामुळे रात्री रुग्णसेवा देताना डॉक्टरांचा जीव टांगणीला लागलेला असतो़ ३० खाटांच्या या रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी वर्धा, नागपूर तसेच अन्य शहरांतून ये-जा करतात़ कुणाचाही वचक नसल्याने कुणीही मुख्यालयी राहत नसल्याचा प्रत्यय येत आहे़ जिल्हा शल्यचिकीत्सकांचा नोकरीचा काळ कमी शिल्लक असल्याने तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़ अर्थकारण केल्यास वरिष्ठ अधिकारीही कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे़ रुग्णालयातील या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे़ ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालयात केवळ डॉक्टर नसल्याने आजारी असल्याचे दिसते़ आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)