लॉकडाऊनमुळे परसबाग उन्हाळ्यातही टवटवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:01+5:30
गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा घरा घरातील बगीचे टवटवीत दिसून येत आहे. फुलांचा बहर मनमोहक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक फटका बसतो तो बंगल्यासमोरील गार्डन, घरातील बगीचे यांना. मात्र यंदा ती वेळ आली नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासूनच देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे घरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही जाता आले नाही. त्यामुळे ज्यांच्या घरात बगीचे आहेत. त्या सर्वांनी यंदा बगीचाची चांगली निगा राखली. सुदैवाने मागील वर्षी जिल्ह्यात पाणी टंचाई वर्धा शहरात जाणवली होती ती यंदा जाणवली नाही.
त्यामुळे फुलझाडांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात ४४ -४५ अंश सेल्सियसवर पारा गेला तरी घराच्या बगीच्यातील झाडे टवटवीत दिसून येत आहे. वर्धा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहर परिसराला लागून असलेल्या नालवाडी, पिपरी, सावंगी, उमरी, मसाळा, सिंदी (मेघे) आदी भागात नोकरदार, शेतकरी तसेच मध्यवर्गीय लोकांनी प्लॉट घेऊन घरे बांधली आहेत. त्या नागरिकांनी घरात बगीचा सुध्दा तयार केले आहे. अशा १० ते १५ टक्के लोकांकडे बगीच्याची निगा राखण्यासाठी माळीकाम करणारे लोक सुध्दा ठेवलेले आहेत.
दरवर्षी नागरिक उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना सुट्टया लागल्यावर बाहेरगावी जात असत. काही लोक पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी रवाना होत होते. अशा प्रसंगी घरातील बगीच्याची जबाबदारी माळी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा शेजाऱ्यांवर सोडून दिली जायची त्यांनी किमान संध्याकाळी आपल्या बगीच्यातील झाडांना पाणी घालावे अशी अपेक्षा राहायची यात कुचराई झाल्यास बगीचा वाळून अनेक रोप मरून जात. गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा घरा घरातील बगीचे टवटवीत दिसून येत आहे. फुलांचा बहर मनमोहक आहे.
टेरेस गार्डनही बहरले
लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेरच पडले नाही. त्यामुळे यावेळेचा काय सदपयोग करायचा तर नागरिकांनी घरातील बगीच्यावर आपले लक्ष केंद्रीत केले. यांचा परिणाम असा झाला की काही नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर बगीचा नियोजनबध्द पध्दतीने फुलविला. काही नागरिकांना घराच्या परिसरात असलेल्या झाडांची निगा राखण्यावर भर दिला. त्यामुळे यावर्षी कडक उन्हाळ्यातही शहरात अनेक घरातील बगीचे फुललेले दिसत आहे. ज्यांच्या शेतातही फुलझाडे होती. त्यांनीही फुलांची चांगली निगा राखली. जेव्हा की, उन्हाळ्यात फुलांना लॉकडाऊनमुळे मागणीच नव्हती. तरीही फुलझाडे चांगले बहरले हे विशेष.