पंचमस्तंभीय प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:45 PM2017-10-07T23:45:23+5:302017-10-07T23:45:34+5:30
देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय. लोकशाहीला दगा देणारी शक्ती म्हणजे पंचम स्तंभ होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
प्राचार्य दिनकर मेघे व्याख्यान मालेत लोकशाही स्तंभ आणि पंचम स्तंभ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. एन.एन. ठेंंगरे होते. यावेळी मंचावर सरीता मेघे, श्रीकांत बाराहाते उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले की, सध्या देशात पंचम स्तंभीय प्रवृत्ती निर्माण झाली आहे. त्यांनी देशाचा मिडीया आपल्या ताब्यात घेतला असून न्याय व्यवस्था, पोलीस गुप्तचर यंत्रणा आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रवृत्तीमुळे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्याची व लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. एकीकडे या देशाचे पंतप्रधान अमेरिकेत जावून इस्लामिक दहशतवादावर भाषण देतात. मात्र २००२ गुजरात दंगलीत झळ बसलेले २ हजार इस्लाम धर्मिय अजून ही निर्वासितांच्या छावणीत आहे. त्यांची भेट घ्यावी, असे देशाच्या पंतप्रधानाला वाटत नाही.
ज्यावेळी १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाचा राष्ट्रध्वज आपल्या कचेºयांवर फडकविला नाही. कारण हिंदु राष्ट्र निर्माण झाले नाही. ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण झाले अशी त्यांची धारणा होती. १९८० ते १९८४ या कालावधीत ६० हजार शिख दहशतवादी कारवायात मारल्या गेले. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येनंतर दिल्लीत ३ हजार शिख मारल्या गेले. या तीन हजार लोकांच्याच हत्याकांडाची चर्चा पंचम स्तंभीय प्रवृत्ती करते, असे केतकर म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार करून जगातील ३० देशांना एक संघ केले होते. त्यानंतर इंदिराजींनी हे कार्य पुढे नेले. आज अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीतून भारत बाहेर पडला आहे. नेहरूंनी निर्माण केलेल्या प्रत्येक बाबी नष्ट करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. नियोजन आयोग गुंडाळण्यात आला. मुंबईतील नेहरू इंस्टिट्युट या संस्थेचे विज्ञान कार्याचे अनुदान बंद करण्याचे काम सुरू झाले आहे. संस्थेचे नाव बदलवा असा निरोप या संस्थेच्या पदाधिकाºयांना देण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास बदलविण्याचे काम पंचम स्तंभीय प्रवृत्ती करीत आहे. १९३३ महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न सुरू झाला. १९४८ ला गांधीजींची हत्या झाली. जवळ जवळ चार न्यायालयाने संपूर्ण पुराव्यासह गांधी हत्येचा निकाल दिला. तरीही आज गांधी हत्येच्या पुन्हा तपासाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते कुमार केतकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार अमर काळे, आमदार डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय श्रीकांत बाराहाते यांनी करून दिला संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले.