जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी घेतो दोन लाखांचे वार्षिक उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:05 AM2021-01-28T11:05:08+5:302021-01-28T11:05:28+5:30
Wardha News नोकरीच्या मागे न लागता अल्लीपूर येथील युवा शेतकऱ्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकर शेतात पारंपरिक शेतीच्या माध्यमातून वार्षिक दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
वर्धा : नोकरीच्या मागे न लागता अल्लीपूर येथील युवा शेतकऱ्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकर शेतात पारंपरिक शेतीच्या माध्यमातून वार्षिक दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
युवा शेतकरी उमेश उगेमुगे
येथील युवा शेतकरी उमेश उगेमुगे (२८) याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा जिद्दीने शेती केल्यास भरघोस यश मिळवू शकतो, असे त्याला वाटले. त्याने त्याच्या दोन एकरातील शेतजमिनीवर रात्रंदिवस शेतीला कसून शेतात नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने शेती करीत फुलकोबी, ब्रोकली कोबी, टोमॅटो, पत्ताकोबी, नवरगोल, चौळा हे पीक घेतले. शेतातून जो माल निघतो, तो माल उमेश स्वत: परिसरातील बाजारात विक्रीला घेऊनही जातो. त्याने दोन एकर शेती कसून तब्बल दोन लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेऊन पारंपरिक शेतीकडे वळण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
शेतीचा सर्व खर्च वजा जाता वार्षिक दोन लाख रुपये मी कमावत आहे. युवा पिढीने नोकरी लागली नाही, म्हणून खचून न जाता स्वनिर्भर बनले पाहिजे. कष्ट करण्याची लाज जर बाळगली, तर तुम्ही कधीच यशोशिखर गाठू शकणार नाही त्यामुळे जिद्दीने आणि चिकाटीने कष्ट केल्यास नक्कीच यश गाठता येईल.
उमेश उगेमुगे, युवा शेतकरी.