खड्डेमय रस्त्यामुळे अपघात, कुटुंब उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:49 PM2017-09-25T22:49:14+5:302017-09-25T22:49:35+5:30
पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत. परिणामी, अपघातांत वाढ झाली आहे. अशाच एका अपघातात पती-पत्नी जखमी झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. दोन दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. यामुळे कार्यकारी अभियंत्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
खडकी-अंतोरा-बेलोरा रस्ता क्र. ३३ वर ०/१०० ते १६/६०० किमी दरम्यान किन्हाळा ते खंबितपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाभळीची झाडे वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही व अपघात होतात. माणिकनगर गावाजवळ एक मोठा खड्डा आहे. येथे अपघाताचे सातत्य आहे. माणिकनगर येथील ज्योती रवी गेडाम या पतीसह दुचाकीवर जात असताना खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कुटुंबाला आतापर्यंत उपचारासाठी १० लाख रुपये खर्च करावे लागले; पण अद्याप प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचे पती रवी यांच्यावरही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एका खड्ड्यामुळे या कुटुंबाचा अख्खा संसार उघड्यावर आला. अंतोरा येथील अतुल वानखडे पत्नीसह मोर्शी येथे जात असताना याच खड्ड्यात पडले. यामुळे त्यांनाही गंभीर मार लागला. उपचारासाठी हजारो रुपये खर्च आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी, उपविभाग आष्टी यांना निवेदन देण्यात आली; पण खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही. यामुळे दोषी व जबाबदार कार्यकारी अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, जखमींच्या कुटुंबियाना मदत द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. उपविभागीय अभियंता कार्यालयात निवेदन ठाकरेसह डॉ. नरेंद्र देशमुख, अरविंद पांडे, अनिल ठाकरे, अंकित मोहोड, मंगेश नागपूरे, राजेश नागपूरे, नामदेव लोखंडे उपस्थित होते.