पावसामुळे शेतकरी सुखावला
By admin | Published: June 11, 2017 12:44 AM2017-06-11T00:44:50+5:302017-06-11T00:44:50+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळवाहीची कामे आटोपली असून पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या होत्या. पावसाची त्याची प्रतीक्षा शनिवारी संपली.
कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पावसाच्या सरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळवाहीची कामे आटोपली असून पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या होत्या. पावसाची त्याची प्रतीक्षा शनिवारी संपली. जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. यात काही ठिकाणी जोरदार तर कुठे पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या.
समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात सायंकाळी चांगलाच पाऊस आला. तर झडशी, पवनार, आष्टी, नंदोरी, चिकणी (जामणी) व वर्धेत पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. ज्या भागात जोराचा पाऊस आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ करण्याची तयारी केली आहे. तर ज्या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्या भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून आले आहे.
कोरा परिसरात पावसासह वारा असल्याने येथे काही प्रमाणात नुकसान झाले. येथील नाईक यांच्या वाड्यावरील छत उडाले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्याचे दिसून आले. यासह गावातील बाळू लोखंडे, प्रवीण आत्राम, सतीश आत्राम, संजय वैरागडे, सूर्यवंशी, रमेश भोयर यांच्या घरावरील टीना उडाल्या. शाहु पंढरे यांच्या शेतातील गोठ्याचे नुकसान झाले. पावसासह आलेल्या वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून त्यांच्याकडून रविवारपासून पेरणीच्या कामाला प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज कोसळून चार बैल ठार
नाराणपूर/ गिरड : समुद्रपूर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यात वीज पडून चार बैल ठार झाले आहे. नारायणपूर शिवारातील सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीची बैलजोडी ठार झाली. त्यांची जोडी शेतात बांधून होती. यात त्यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. तर याच काळात गिरड लगतच्या केसलापूर शिवारात वीज कोसळून अनिल कामडी यांची बैल जोडी ठार झाली. त्यांची बैलजोडीही शेतात बांधून होती. ऐन हंगामाच्या तोंडावर आलेल्या या आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.