रेती उपस्यामुळे भाविकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:32 PM2017-12-29T23:32:19+5:302017-12-29T23:32:42+5:30
रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
रेती घाटातून जेसीबी, पोकलॅन, बोटीद्वारे रेतीचा उपसा करता येत नाही. असे असले तरी हल्ली प्रत्येक घाटावर या साहित्याचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे. सध्या वर्धा नदीवरील सातेफळ रेतीघाटातून रेतीचा उपसा केला जात आहे. या रेतीघाटाची हद्द एक किमी आहे. असे असले तरी सदर घाटधारक तब्बल पाच किमीपर्यंतच्या रेतीचा उपसा करीत असल्याचे समोर आले आहे. कोटेश्वर देवस्थानाचे आगळे महत्त्व असल्याने अनेक भाविक येथे पुजेसाठी येतात. शिवाय उत्तरवाहिनीमध्ये स्रान करण्यासाठीही येतात. राखड शिरविणे तथा दसव्यासाठी येणारे नागरिकही नदी पात्रामध्ये स्रानासाठी जातात. काही युवक नित्यनेमाने पोहण्याचा आनंद लुटण्याकरिता येतात. कोटेश्वर येथे वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने पाण्याचा फारसा ओढा नसतो. यामुळे जीविताला धोका होण्याची शक्यता कमी असते; पण सध्या रेतीघाटधारक अतिरेकी उपसा करीत असल्याने भाविकांच्याच जीविताला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सातेफळ येथील रेतीघाटातून रेती काढत असतानाच बोटी कोटेश्वर येथील गंगाघाटापर्यंत आणल्या जात आहेत. कोटेश्वरजवळील रेतीचा उपसा केला जात असल्याने नदी पात्रामध्ये खोलवर खड्डे पडले आहेत. हा प्रकार नदीत आंघोळ करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. आजपर्यंत सुरक्षित पात्र म्हणून ओळख असलेल्या कोटेश्वर येथे आता रेतीच्या उपस्यामुळे अनुचित घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक, घाटधारकाने आपल्या हद्दीतून रेतीचा उपसा करणे गरजेचे होते; पण पैशाच्या हव्यासापोटी हद्द सोडून रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडविला जातो. हा प्रकार मागील काही वर्षांत ‘कॉमन’ झाल्याचेच पाहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनाने याची दखल घेत कोटेश्वर येथील गंगाघाटाकडून रेती काढणाºया घाट धारकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
नदी पात्रामध्ये जीवघेणे खड्डे
कोटेश्वर देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने कोटेश्वरचे पौराणिक महत्त्व आहे. या मंदिरात दर्शनाकरिता दूरवरून भाविक येत असतात. शिवाय उत्तरवाहिनी असल्याने येथील पूजाविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच राखड शिरविणे, दसवा यासह अन्य धार्मिक विधींकरिता भाविक कोटेश्वरला येतात. शिवाय पवित्र महिन्यांमध्ये उत्तरवाहिनीत स्रानाकरिताही भाविक येत असतात. आता सातेफळ घाटधारक कोटेश्वर येथील गंगाघाटाजवळच बोटीद्वारे रेती काढत असल्याने पात्रात खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे खड्डे अनुचित घटनांना निमंत्रण देणारे ठरत आहे.
सातेफळ येथील रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला आहे. या घाटधारकाने नदीपात्रातून थेट बोटींद्वारे रेतीचा उपसा सुरू केला आहे. शिवाय नदीच्या दोन्ही दिशेकडून रेतीचा उपसा केला जात आहे. हद्द एक किमी असताना पाच किमीतील रेती काढली जात आहे. यातही कोटेश्वर येथील घाटापर्यंत रेती उपसली जात असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
- मनोज वसू, माजी पं.स. सभापती, देवळी.
शिरजोरीपुढे नागरिक हतबल
सदर रेती घाटधारकांना अनेक नागरिकांनी कोटेश्वर गंगाघाटाजवळून रेतीचा उपसा करू नका, अशी विनंती केली. शिवाय अनेकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण घाटधारक तथा त्यांचे कामगार नागरिकांशी वाद घालून शिरजोरीने रेतीचा उपसा करतात. यामुळे नागरिकही हतबल झाले आहेत.