रस्त्यालगतच्या विहिरी ठरताहेत अपघातास कारण
By admin | Published: January 2, 2017 12:12 AM2017-01-02T00:12:22+5:302017-01-02T00:12:22+5:30
रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते;
संबंधित विभागाचे दुर्लक्ष : विहिरीला लोखंडी कठडे लावून सुरक्षित करण्याची मागणी
चिकणी (जामणी) : रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. चिकणी गावालगत असलेल्या शेतातील विहिरही धोकादायक ठरत आहे. याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे ही विहीर अपघातास कारण ठरत आहे.
येथील बसस्थानकाच्या समोरून व गावाच्या मध्यभागातून वर्धा मार्ग आहे. हा मार्ग पडेगाव, सालोड, सावंगी (मेघे) मार्गे वर्धा असा गेला आहे. यामुळे चिकणी व जामणी या दोन्ही गावांची वर्दळ याच रस्त्याने असते. विशेष म्हणजे, सावंगी (मेघे) येथे रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. पडेगाव येथून देवळीला शिक्षण घेण्याकरिता व ग्रामस्थांची बाजारपेठ असल्याने त्यांचीही ये-जा असते. या रस्त्याचे खडीकरण २० वर्षांपूर्वी तर डांबरीकरण ५ ते ६ वर्षांपूर्वी झाले; पण अद्यापही या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला लोखंडी कठडे लावण्यात आले नाही. सदर विहीर मोठी आहे. यात मोठे वाहन ट्रक, बस कोसळू शकते.
चिकणी गावाला लागून मनोज देशमुख यांचे शेत आहे. या शेतात पूर्वीपासूनच एक विहीर आहे. ही विहीर चिकणी-वर्धा मार्गालगत अवघ्या दोन फुट अंतरावर आहे. यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. विहिरीच्या सभोवताल कुंपण असून गवत व कचरा वाढला आहे. यामुळे ही विहीर दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो. यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती पसरली आहे. प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना समज देत विहिरीच्या बंदोबस्ताची उपाययोजना करावी. विहिरीला लोखंडी कठडे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)
खडीकरणामुळे विहीर झाली रस्त्याला समांतर
चिकणी येथील शेतकरी देशमुख यांच्या गावालगतच्या शेतात मोठी विहीर आहे. ही विहीर वडिलोपार्जित असून तिला तोंडी बांधलेली आहे. असे असले तरी रस्त्याचे बांधकाम नंतर झाले. यात खडीकरण करण्यात आल्याने विहीर आणि रस्ता समांतर झाला आहे. परिणामी, या विहिरीत पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षेसाठी एकतर रस्ता व विहिरीच्या मधे लोखंडी कठडे बसवावे वा विहिरीची तोंडी आणखी उंच करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.