टंचाईत ‘ते’ नि:शुल्क देतात बोअरवेलचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:21 PM2019-05-04T22:21:49+5:302019-05-04T22:22:23+5:30
स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.
संजय पुंडलिकराव चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून केजाजी चौक, वॉर्ड क्रमांक ११ येथे त्यांचे किराणा दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून ते येथे वास्तव्याला आहेत. अल्प पर्जन्यमानामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कधी नव्हे, एवढी पाणीटंचाई निर्माण झाली. दिवस उजाडताच आया-बहिणींची आपल्या लहानग्यांसह हंडाभर पाणी मिळविण्यासाठी होणारी धावाधाव पाहून संजय यांच्या मनाला पाझर फुटला. आपल्या संस्कृतीत तहानलेल्यांना पाणी देणे पुण्याचे काम समजले जाते. हे ध्यानात घेत संजय चौधरी यांनी घराशेजारीच तब्बल ६० हजार रुपये खर्च करून विंधन विहीर केली. विंधन विहिरीला १८० फुटांवरच पाणी लागले आहे. गोंड प्लॉटमध्ये अनेकांकडे खासगी विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरीदेखील आहेत. मात्र, पाण्याचे हे सर्वच स्रोत कोरडे पडले आहेत. अनेकांनी नव्याने विंधन विहिरी केल्या; मात्र पाणीच लागले नाही.
परिसरात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: घरगुती वापराकरिता पुरेल एवढे पाणी घेऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पाणी द्यायचे त्यांनी ठरविले. मागील २० दिवसांपासून ते नागरिकांना आपल्या येथील विंधन विहिरीचे पाणी कुठलेही शुल्क न घेता उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास त्यांच्याकडे पाण्याकरिता प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी मिळत असल्याने नागरिकही समाधानी असून त्यांचे आभार मानताना दिसतात. माणुसकी आजही जिवंत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
नगरसेवकांची निष्क्रियता
गोंड प्लॉट, केजाजी चौक वॉर्ड क्रमांक ११ येथील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींना केव्हाच कोरड पडली आहे. नगरपालिकेद्वारे सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो, मात्र हे पाणी आठ दिवस पुरत नाही. वॉर्डात पाणीप्रश्न पेटला असताना संबंधित नगरसेवकांकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. नागरिक पाणी समस्या घेऊन नगरसेवकांकडे गेले असता टॅकरची व्यवस्था करू, असे केवळ आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठल्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविषयी नागरिकांत प्रचंड रोष आहे.