दप्तरी गटाच्या हेकेखोरीमुळेच भाजपाचे कॉँग्रेसला समर्थन
By admin | Published: December 4, 2015 02:15 AM2015-12-04T02:15:55+5:302015-12-04T02:15:55+5:30
येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणूक झालेल्या रस्सीखेचमुळे संपूर्ण जिल्हाभर चर्चिल्या गेली.
पत्रकार परिषद : उपनगराध्यक्ष हांडे यांचा खुलासा
सेलू : येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणूक झालेल्या रस्सीखेचमुळे संपूर्ण जिल्हाभर चर्चिल्या गेली. यात दप्तरी गटाकडून होत असलेल्या हेकेखोरपणामुळे अगदी वेळेवर कॉँग्रेस पक्षाला समर्थ देऊन सत्तेत सहभागी व्हावे लागले, असा गौप्यस्फोट सेलू नगर पंचायतीचे उपाध्यक्ष चुडामण हांडे यांनी पत्रकार परिषदेतून केला.
हांडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. हांडे म्हणाले, आजही भाजपाचा आहे, कालही होतो, असा विश्वास देवून दप्तरी यांना भाजप गटाने समर्थन घ्यावे असा पक्षश्रेष्ठींचा हट्ट होता. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, तालुका अध्यक्ष राणा रणनवरे व ज्येष्ठ नेते मनोहर सोमनाथे यांची आग्रही भूमिका होती; परंतु वाटाघाटीत दप्तरी यांनी आम्हाला वारंवार अपमाणित केले तसेच निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या विरोधात १७ उमेदवारांचे आव्हान उभे केले. त्यामुळे शहरात भाजपला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही.
नगर पंचायतच्या राजकारणात भाजपला सहभागी करण्यासाठी व पक्षवाढीच्या कार्यासाठी आवश्यक बाब म्हणून हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असेही यावेळी हांडे म्हणाले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या दिवशी आम्ही दप्तरी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेकरिता चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘तुमची गरज नाही, माझी युती जयस्वाल यांच्या सोबत झाली’, असे खडे बोल सुनावून अपमानित केले व चर्चा न करताच निघून गेल्याचे म्हटले आहे. शेवटी आमच्यापुढे कोणताही पर्याय शिल्लक नसताना कॉँग्रेसचे नेते डॉ. राजेश जयस्वाल यांनी आम्हाला घरी येवून सत्तेसाठी आमंत्रित केले व आम्ही सुध्दा पक्षाचे हित लक्षात घेत निसंकोच समर्थन दिल्याचे हांडे यावेळी म्हणाले.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कॉँग्रेसला समर्थन देतेवेळी झालेल्या वाटाघाटीत सहकाऱ्यांनी आगामी अडीच वर्षांनंतर भाजपाचा नगराध्यक्ष असेल हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयस्वाल यांनी तो मुद्दा तत्वत: मान्य केला. निवडणूक निकालानंतर झालेली त्रिशंकु परिस्थिती पाहता सेलू नगराच्या विकासाला प्राधान्य देत कॉँग्रेसचे डॉ. राजेश जयस्वाल यांच्यासोबत असलेले राजकीय मतभेद विसरून युती करण्याचा निर्णय सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून घेतल्याचे हांडे म्हणाले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर सोमनाथे, भाजपाचे तालुका सरचिटणीस जीवन सुर्वे, हिरामण हांडे, नगरसेवक सावित्री उईके, सनी खोडे व केळझरचे उपसरपंच फारूक शेख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)