सांडपाण्यामुळे नदी पात्र होतेय दूषित
By admin | Published: April 6, 2015 02:03 AM2015-04-06T02:03:01+5:302015-04-06T02:03:01+5:30
बोरधरण प्रकल्पापासून वाहत असलेल्या नदीचा प्रवाह उन्हाळ्याच्या दिवसात बंद होतो़ असे असले तरी गावोगावचे सांडपाणी
नाल्यांचा अभाव : नदी स्वच्छता अभियानाकडेही दुर्लक्षच
सेलू : बोरधरण प्रकल्पापासून वाहत असलेल्या नदीचा प्रवाह उन्हाळ्याच्या दिवसात बंद होतो़ असे असले तरी गावोगावचे सांडपाणी गावालगत नदीच्या पात्रात साचत आहे़ यामुळे बोर नदीचे पात्र दूषित होत आहे. नाले नाही, जनजागृतीचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याचे चित्र आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता अभियानच हाती घेणे गरजेचे झाले आहे़
बोर नदीच्या काठावर हिंगणी, मोही, किन्ही, घोराड, सेलू, बेलगाव, धानोली आदी गावे आहेत़ याच नदीवर हिंगणी ते सेलूपर्यंत अनेक कोल्हापुरी बंधारे आहेत़ असे असले तरी दोनच बंधाऱ्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी अडविले जाते़ हिवाळ्याच्या दिवसांपासूनच नदीचा प्रवाह मंदावतो़ उन्हाळ्याच्या दिवसांत तो प्रवाह पूर्णत: बंद होतो. अशावेळी गावांतून वाहणारे सांडपाणी नदीच्या खळग्यात साचले जाते. नदीच्या काठावर असलेल्या सर्वच गावांतील सांडपाण्याच्या नाल्या नदीच्या दिशेने वाहत असल्याचे दिसते़ नव्यानेच झालेल्या सेलू नगर पंचायत व या गावाचा वाढता विस्तार पाहता नदीचे सौंदर्य जपणे गरजेचे झाले आहे़
ऐन गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात गावातील संपूर्ण सांडपाणी साचले असून नदीचे पात्र बेशरमच्या झाडांनी वेढले आहे. नदी काठावर आठवडी बाजार भरत असून विक्रेतेही भाजीपाला ताजातवाणा राहावा म्हणून नदीचे पाणी शिंपडत असतात. मोही व किन्ही येथील सांडपाणी गावालगतच साचत असून विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे हीच परिस्थिती आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या शासनस्तरावर नद्यांचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे़ बोर नदी पात्रही दूषित होण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ स्थानिक व जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़(शहर प्रतिनिधी)
बेशरमने वेढले नदीचे पात्र; त्या बंधाऱ्याकडेही दुर्लक्ष
नदीमध्ये वाढलेल्या बेशरमच्या झाडांनी पात्राला पूर्णपणे वेढले आहे़ दिवसेंदिवस यात वाढच होत असल्याचे दिसते़ ही झुडपे कापणे गरजेचे झाले आहे़
गत १० वर्षांपासून घोराड गावालगत असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणीच अडविले जात नाही़ या बंधाऱ्यांकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे़