शॉर्टसर्किटमुळे गोठ्याची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:01 PM2019-03-04T22:01:53+5:302019-03-04T22:02:28+5:30
हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारातील वसुदेव नारायण अवचट यांच्या शेतातील गोठ्याची शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारातील वसुदेव नारायण अवचट यांच्या शेतातील गोठ्याची शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या अडचणीत भर पडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, येरणगाव येथील वसुदेव नारायण अवचट यांची हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारात शेती आहे. रविवारी शेतातील गोठ्या शेजारून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीची ठिणगी खाली पडली. बघता-बघता या आगीने संपूर्ण गोठ्यालाच आपल्या कवेत घेतले. शेतशिवारात जनावरे बांधता यावी. शिवाय तेथेच रासायनिक खत आणि शेतमाल ठेवता यावा या उद्देशाने शेतकरी अवचट यांनी शेतात गोठा बांधला होता. परंतु, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोठ्याचा कोळसाच झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या भक्षस्थानी गोठ्यात ठेवून असलेले सिंचनासाठी वापरण्यात येणारे ३० प्लास्टिकचे पाईप, जनावरांचा चारा, रासायनिक खत, शेतीउपयोगी पडले. या साहित्याचा राखरांगोळी झाल्याने शेतकरी अवचट यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. महावितरणने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.