अल्प कमिशनमुळे दुग्ध सहकारी संस्था डबघाईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:01+5:30
चराई क्षेत्राचा अभाव ढेप सरकीचे वाढलेले भाव श्रम करणारे कमी व खर्र्चांवर आधारीत मिळत नसल्याने दुधाचे उत्पादन कमी झाले. तरीही रोहणा, बाई व बोथली येथे अनुक्रमे गाडगेबाबा दुग्ध सह संस्था, स्व. महादेव कुऱ्हाडे महिला प्रधान दुध सह. संस्था व श्रीकृष्ण दुग्ध उत्पादक सह. संस्था कार्यरत आहे. या सहकारी संस्थांवर संकलित केलेले दुध शासकीय दुध योजनेला देण्याची सक्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : मागील १० वर्र्षांपासून शासनाकडून राज्यातील दुग्ध सहकारी संस्थांना केवळ ५० पैसे प्रति लिटर एवढे अल्प कमिशन मिळत असल्याने दुग्ध उत्पादक सहकारी संस्था आर्र्थिक डबघाईस आल्या आहेत.
एकेकाळी विदर्भाचे मॅनचेस्टर म्हणून रोहणा, सालदरा, पिंपळखुटा हा भाग दुध उत्पादनात अग्रेसर होता. पण चराई क्षेत्राचा अभाव ढेप सरकीचे वाढलेले भाव श्रम करणारे कमी व खर्र्चांवर आधारीत मिळत नसल्याने दुधाचे उत्पादन कमी झाले. तरीही रोहणा, बाई व बोथली येथे अनुक्रमे गाडगेबाबा दुग्ध सह संस्था, स्व. महादेव कुऱ्हाडे महिला प्रधान दुध सह. संस्था व श्रीकृष्ण दुग्ध उत्पादक सह. संस्था कार्यरत आहे. या सहकारी संस्थांवर संकलित केलेले दुध शासकीय दुध योजनेला देण्याची सक्ती आहे. सध्या गाडगेबाबा संस्था दररोज ६०० लीटर, स्व. कुऱ्हाडे संस्था १२५ लीटर तर श्रीकृष्ण सह. संस्था १०० लिटर दुध शासकीय योजनेला देतात. यासाठी शासन या संस्थांना कमिशन म्हणून केवळ प्रति लिटर ५० पैसे देतात. सदर कमिशन अल्प असून या कमिशनवर संस्थेच्या खोलीचे भाडेही निघत नाही.
नोकर खर्च, व्यवस्थापन खर्च, ऑडीट खर्च व उत्सव खर्च यासारखे खर्च कसे भागवावे असा प्रश्न शिल्लक राहतो. यामुळे जिल्ह्यातील अनेक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. तसेच शासन ३.५ फॅट असलेल्या व २९.५ डिग्री सेल्शीयंसवर असलेल्या दुधाला केवळ २५ रूपये प्रतिलिटर भाव देतात.
या पार्श्वभूमीवर खासगी दुध खरेदीदार शेतकऱ्यांना प्रतिलिटर १.२० रूपये कमिशन तर भाव देखील प्रति लिटर २९ रूपये देतात. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी आपले दुध सहकारी संस्थांना देण्याऐवजी खासगी खरेदीदारांना देतात. परिणामी सहकारी संस्थांचे संकलन कमी आहे व त्यामुळेच कमिशनातून मिळणारे उत्पन्न कमी झाले व त्यातूनच संस्था चालविणे संचालकांना अडचणीचे झाले आहे. म्हणून शासनाने दुग्ध सहकारी संस्थांना प्रतिलिटर कमिशन १.५० रूपये द्यावे अशी मागणी संस्थांचे व्यवस्थापक राजेंद्र जडावे, निवल व गलाट यांनी केली आहे.