गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांची वीण धोक्यात
By admin | Published: March 16, 2017 12:41 AM2017-03-16T00:41:46+5:302017-03-16T00:41:46+5:30
धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात.
पाणपक्ष्यांची संख्या घटतेय : बहुतांश धरणांवर वाढलाय गाळपेरा
वर्धा : धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात. या गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांचे अधिवास मानवी हस्तक्षेपाच्या दबावाखाली येत आहे. परिणामी, काही पाणपक्ष्यांची वीण धोक्यात आली आहे.
पोथरा, लालनाला, महाकाळी, अप्पर वर्धा, निम्न वर्धा, कार प्रकल्प, रिधोरा, मदन, डोंगरगाव तलावासह अनेक प्रकल्पांवर गाळपेऱ्याचे प्रमाण वाढत आहे. यात रबी पिकांसह भाजीपाला व डांगराची शेती आढळते. धरणाचे पाणी ओसरू लागताच शेतीला प्रारंभ होतो. नोव्हेंबर-डिसेंबरपासून मार्च-एप्रिलपर्यंत लागवड केली जाते. या कालावधीतच पाणथळ जागांवर स्थानिक, स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचे प्रमाण वाढलेले असते. काही स्थानिक पाणपक्ष्यांचा वीणकाळ फेब्रुवारी ते मे-जून असल्याने दरवर्षी वीण धोक्यात येत पाणपक्ष्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नदीसुरय (रिव्हर टर्न), छोटा सुरय (लिटील टर्न), छोटा आर्ली (स्मॉल प्रॉटीनकोल), शेकाट्या (ब्लॅड वींग्ड स्टील्ट), छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग्ड प्लोअर), लाल गाठीची टिटवी (रेड वॅटल्ड लॅपपींग), रंगती पाणवाला (ग्रेटर पेटेंड स्राईप), केटींगश चिखल्या (केटींश प्लोवर) यासह काही पक्षी पाणथळ जागेजवळ जमिनीवर अंडी घालतात. ती त्यांची संमिश्र वसाहतच असून धरणाच्या बाजूला नव्हे तर मागच्या बाजूला (बॅक वॉटर) वा उथळ क्षेत्रात असते. धरणातील पाण्याखालची जमीन उघडी पडून चिखलाला पडलेल्या पोपड्यांमध्ये विविध जलजीव असतात. ते पाणपक्ष्यांचं खाद्य असतं. ती त्यांची अन्नशोधनाची जागा असते व याच अधिवासात ते अंडी देतात. या वीण वसाहतीतील पक्ष्यांची संख्या शेकड्यांतही असू असते.
परवानगी न घेताच गाळपेरा
वर्धा : पाणलोट क्षेत्रातून वाहत येणारे पोषक द्रव्य व घटकांमुळे या पाणथळ जागा सुपिक व उत्पादनक्षम असतात. यामुळेच धरणात शेती गेलेले मूळ मालक वारंवार त्या जमिनीकडे वळतात. मूळ मालक करीत नसल्यास इतर कुणीही ती जमीन वाहतात. काही ठिकाणी परराज्यातून वा राज्यातील दूर भागातून आलेले डांगराची शेती करतात. अगदीच तुरळक ठिकाणी संबंधित विभागाकडून पावती फाडून परवानगी घेतली जाते. बहुतांश ठिकाणी अवैधरित्या हे काम चालते.
खरीप पिकानंतर स्व-जमिनीकडे दुर्लक्ष करून गाळपेऱ्यासाठी चढाओढ असते. डांगराची शेती करणारे कुटुंबासह येतात. पाच-सहा महिने ते तेथेच असतात. हा मानवी वावर, कुत्रे, गुरे, नांगरणी, रासायनिक फवारणी, मालाची ने-आण, मासेमारी व झिरो फिशींग नेटचा वापर याचा परिणाम पक्षी व त्यांच्या अधिवासावर होतो. अधिवास ऱ्हासामुळे पाणपक्ष्यांची वीण संकटात आल्याचे दिसते. तलाव वा धरणाची मागील बाजू हा अत्यंत नाजुक, महत्त्वाचा व सुक्ष्म अधिवास आहे. गाळपेऱ्यासाठी परवानगी देताना पक्षी अधिवासाचा विचार होणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
गाळपेरा हा वाळू उपस्या इतकाच गंभीर प्रश्न आहे. गाळपेरा नियंत्रित राहावा यासाठी एक सीमारेषा निश्चित करावी. नियमावली तयार करावी. पाणथळीच्या जागांवर होणारे अतिक्रमण रोखणे व त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र पाणथळ जागा संवर्धन कायदा पारित करावा वा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. पाणपक्षी, त्यांचे अधिवास व महत्त्व याबाबत शेतकऱ्यांत जागृतीसाठी पक्षीमित्र, पाटंबंधारे विभाग, वनविभाग यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- दिलीप वीरखडे, पक्षी अभ्यासक़, वर्धा.