अत्यल्प आधार केंद्रामुळे कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:37 PM2018-01-29T23:37:24+5:302018-01-29T23:37:55+5:30
केंद्र तथा राज्य शासन प्रत्येक शासकीय कामकाज आॅनलाईन करण्याच्या मानसिकतेत आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : केंद्र तथा राज्य शासन प्रत्येक शासकीय कामकाज आॅनलाईन करण्याच्या मानसिकतेत आहे. यासाठी आधार कार्डला अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे. आधार क्रमांकाला सर्वच बाबी लिंक करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी पूरेशी यंत्रणा मात्र कामी लावण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यल्प आधार कार्ड केंद्र असल्याने साधे लिंक करण्यासाठीही दोन-तीन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
शासनाने आॅनलाईन व्यवस्थेला प्राधान्य देत आधार कार्ड अनिवार्य केले आहे. प्रत्येकाचा आधार क्रमांक बँक खाते, गॅस सिलिंडर, शिधापत्रिका, मोबाईल, पॅन कार्ड आदींशी लिंक करण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी नागरिकांना आधार केंद्र, बँका, तहसील कार्यालय, गॅस एजेंसी तथा मोबाईलच्या कार्यालयांत धाव घ्यावी लागत आहे. हे करीत असताना एकाच वेळी गर्दी होत असल्याने कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहे. पुलगाव तथा परिसरातील ग्रामीण भागासाठी पुलगाव येथे दोनच आधार कार्ड केंद्र देण्यात आलेले आहेत. आता परिसरातील ७० हजार नागरिक केवळ दोन आधार कार्ड केंद्रावर आपली कामे कशी करून घेऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दररोज पुलगाव-नाचणगाव येथील दोन्ही आधार केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. असाच प्रकार हिंगणघाट, आर्वी, आष्टी, समुद्रपूर, सेलू तथा वर्धा तालुक्यातही घडत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत.
वर्धा जिल्ह्यात शासनाकडून दहा ते बारा आधार कार्ड केंद्र देण्यात आलेले आहेत. यातील आठ केंद्र सुरळीतपणे सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्याला एक, असे प्रमाण होत असून तालुक्यातील सर्वच नागरिक केवळ एका केंद्रावर आपली कामे करून घेऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. असे असले तरी जवळपास सर्वच नागरिकांचे आधार कार्ड क्रमांक जनरेट करण्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे. यामुळे अधिक केंद्र दिल्यास त्यावर कार्यरत कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च निघत नाही. यामुळे शासन, प्रशासन यापेक्षा अधिक आधार कार्ड केंद्र देऊ शकत नसल्याची अडचण जिल्हा प्रशासन समोर करीत आहे. यात तथ्यही आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी आधार कार्ड केंद्र सुरू करणे शक्य नाही. असे असले तरी नागरिकांना दिलासा देण्याकरिता तथा त्यांची आॅनलाईन कामे जलदगतीने व्हावी म्हणून कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
सध्या नागरिक आधार केंद्रांवर लिंकिंगसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील आधार केंद्रावर ग्रामीण भागातील नागरिक आधार कार्ड बँक, गॅस एजेंसी, पॅन कार्ड तथा अन्य सेवांशी संलग्न करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आधार केंद्रांवर त्यांची कामे वेगाने होताना दिसून येत नाही. यामुळे चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येते.
अपडेशनच्या अफवेमुळे केंद्रांमध्ये होतेय गर्दी
जिल्ह्यातील जवळपास ८० ते ९० टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्याची कामे पूर्णत्वास गेली आहेत. यामुळे पूर्वी असलेली आधार केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता जिल्ह्यात केवळ सात ते आठ आधार केंद्रच सुरळीतपणे सुरू आहेत. या आधार केंद्रांवर कार्ड लिंक करणे तथा लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे, ही कामे होणे अपेक्षित आहे; पण या विपरित होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात आधार कार्ड अपडेट करावे लागते, अशी अफवा पसरलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आपले आधार कार्ड अपडेट करण्याकरिता आधार्र केंद्रांवर गर्दी करीत असल्याचे केंद्र संचालकाकडून सांगण्यात आले आहे. वास्तविक, एकदा आधार कार्डसाठी बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे बोटांचे ठसे, डोळ्यांचो स्कॅनिंग केल्यानंतर पुन्हा-पुन्हा ते अपडेट करण्याची गरज नाही; पण अफवेला बळी पडत ग्रामीण भागातील नागरिक आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येत असल्याने अन्य कामे प्रलंबित राहत असल्याचेही सांगण्यासत आले आहे.
आॅनलाईनची कामेही कटकटीची
सध्या शासनाने आॅनलाईन प्रणालीवर भर दिला आहे. यात सर्वच कामे आॅनलाईन करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याचा ग्रामीण, अशिक्षित नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक कामासाठी पैसे मोजावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्याकरिता आॅनलाईन सेवांतून काही विशिष्ट सेवा वगळणे गरजेचे झाले आहे.