भीतीमुळे गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:00 AM2022-01-31T05:00:00+5:302022-01-31T05:00:02+5:30
कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सेवाग्राम येथील गांधी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दर्शनीय भागात सूचना फलक लावण्यात आला आहे.
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य लढ्याला दिशा देताना केंद्र राहिलेल्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला संपूर्ण जगात आपले वेगळे स्थान आहे. त्यामुळेच या ठिकाणी अनेक पर्यटक गांधी विचार जाणून घेण्यासाठी येतात. पण, कोविडची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या भीतीमुळे सध्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या बऱ्यापैकी रोडावली आहे. इतकेच नव्हेतर, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून राज्य व केंद्र सरकारच्या कोविड संदर्भातील नियमांचे पालन करून घेतले जात आहे. एकूणच कोविड संदर्भातील नियम पाळूनच स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या सेवाग्राम आश्रमाची माहिती येथे येणाऱ्या पर्यटकांना जाणून घ्यावी लागत आहे.
आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच मार्गदर्शक सूचना फलक
- कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सेवाग्राम येथील गांधी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दर्शनीय भागात सूचना फलक लावण्यात आला आहे.
अनेकांना खुणावतो गांधी आश्रम
- महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला सेवाग्राम येथील आश्रमात राहूनच दिशा दिली. त्यावेळी अनेक महत्त्वपूर्ण बैठका याच आश्रमात पार पडल्या. येथे काही महत्त्वाच्या ठरावांना अंतिम रूपही देण्यात आले. त्यामुळेच गांधी आणि गांधी विचार याविषयी अभ्यास करणाऱ्यांसह पर्यटकांना सेवाग्राम येथील गांधी आश्रम नेहमीच खुणावतो.
आठ दिवसांत केवळ ३ हजार ८६७ पर्यटकांची भेट
- एरवी प्रत्येक दिवशी किमान एक हजार पर्यटक गांधी आश्रमाला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतात. पण, मागील आठ दिवसांत सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला ३ हजार ८६७ पर्यटकांनी भेट दिल्याचे वास्तव आहे.