काहिली करणाऱ्या उन्हामुळे जिल्ह्यातील ‘टायगर’ची प्रादेशिकच्या जंगलाकडे धाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:15+5:30
बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वर्धा जिल्ह्यातील प्रादेशिकच्या जंगलात ४० ठिकाणी, तर देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात २८ मचाणींवरून निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. या उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी तब्बल ५३६ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना व्याघ्र दर्शन झाले नाही. केवळ सहा मचाणींवर वाघाची डरकाळी ऐकू आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्यात दाखल होईल, असे सांगितले जात असले तरी सध्या जिवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे मनुष्यासह विविध प्राणी मुटाकुटीस आले आहेत. अशातच जिवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे वाघांनी आपला मोर्चा थेट प्रादेशिकच्या जंगलाकडे वळविला असून, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या वन्यप्राणी गणनेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वर्धा जिल्ह्यातील प्रादेशिकच्या जंगलात ४० ठिकाणी, तर देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात २८ मचाणींवरून निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. या उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी तब्बल ५३६ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना व्याघ्र दर्शन झाले नाही. केवळ सहा मचाणींवर वाघाची डरकाळी ऐकू आली. पण, याच दिवशी प्रादेशिकचे जंगल परिक्षेत्र असलेल्या आर्वी वनपरिक्षेत्रातील दोन मचाणींवर निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना वाघाचे दर्शन झाले. उन्हाळ्याच्या दिवसांत टायगर प्रादेशिकच्या जंगलाकडे धाव घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
या परिसरात झाले व्याघ्र दर्शन
- आर्वी वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १८८ व कक्ष क्रमांक १८५ या परिसरात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मचाणींवर असलेल्या वन्यजीव प्रेमींना वयस्कर वाघांचे दर्शन झाले. पाणवठ्यावर अचानक वाघ आल्याने मचाणींवरील निसर्गप्रेमींची काही काळाकरिता भांबेरीच उडाली असली तरी व्याघ्र दर्शनामुळे त्यांचा हा दिवस सफल झाल्याचे सांगण्यात आले.
आठ बिबट्यांचे झाले दर्शन
- प्रादेशिकच्या जंगलातील गणनेसाठी उभारण्यात आलेल्या मचाणींवर राहून वन्यजीवप्रेमींनी आठ बिबट्यांची नोंद घेतली. यात सहा वयस्कर बिबट्यांचा समावेश आहे. हिंगणी, खरांगणा या वनपरिक्षेत्रात अनुक्रमे चार व दोन, तर कारंजा आणि समुद्रपूर वनपरिक्षेत्रात प्रत्येकी एक बिबट्याचे दर्शन झाले.