‘रुईया’ दाम्पत्याच्या दायित्त्वाने अधू ‘माही’ चालू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 05:00 AM2022-03-27T05:00:00+5:302022-03-27T05:00:09+5:30
मुख्याध्यापक संध्या पुरी व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी सातत्याने तिची विचारपूस केली. ऑपरेशनबद्दल माहिती मिळताच या दोन्ही शिक्षिकांनी याची माहिती संस्थेचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांना दिली. त्यांनी अर्थसहाय्य करुन मोठा आधार दिल्याने आता माही आयुष्यभराकरिता आपल्या पायावर उभी राहू शकते. माहीचा पुढील फिजिओथेरपी, स्लिट कॅपलर व औषधांचा खर्चही रुईया दाम्पत्याने उचलला आहे. त्यामुळे या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जन्मत: सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार जडल्याने ‘माही’ दोन्ही पायाने अधू झाली. तिला मुळीच चालता येत नव्हते. परंतु आई-वडिलांनी तिची काळजी घेत कधीही अपंगत्त्वाची जाणीव होऊ दिली नाही. पण, नियतीने आपला डाव साधला आणि कोरोनाकाळात वडिलांचे छत्र हिरावून घेतले. घराचा आधारवडच गेल्याने ‘माही’ची आई एकाकी पडली. अशा स्थितीत महिला सेवा मंडळाचे पवन रुईया आणि रश्मी रुईया या दाम्पत्याने ‘माही’च्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी आर्थिक मदतीसह मानसिक आधार दिल्याने अधू असलेली ‘माही’ आता चालू लागली आहे.
माही गुलशन चौधरी असे या मुलीचे नाव आहे. ती वर्ध्याच्या महिला सेवा मंडळ संचालित महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळेत सहाव्या वर्गात शिकत आहे. माहीला जन्मत: च आजार असल्याने तिला चालता येत नव्हते. वडील गुलशन आणि आई शुभांगणा यांनी माहीची काळजी घेत. तिला नियमित शाळेत आणणे, तिला शाळेतून घरी घेऊन जाणे, बाहेरच्या वातावरणात तिला रमविणे, ही सर्व जबाबदारी आई-वडील पार पाडीत होते. सर्व सुरळीत असतानाच २०१९ मध्ये गुलशन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
घराचा आधार गेल्याने नियतीपुढे परिवारच अधू झाला होता. माहीकडे पाहून तिला आधार देण्यासाठी आई शुभांगणा यांना घराबाहेर पडावे लागले. परिणामी माहीला नियमित उचलून शाळेत आणणे, तेथून घरी घेऊन जाणे, हे त्यांना शक्य होत नसल्याने इच्छा नसतानाही शिक्षण बंद करावे लागले. यादरम्यान शुभांगणा यांनी माहीला नागपूरच्या ऑर्थाेपेडिक केअर इन्स्टिट्यूटमध्ये दाखवले. ऑथोर्पेडिक सर्जन डॉ. विराज शिंगाडे यांनी माहीच्या पायाचे ऑपरेशन करणे शक्य असल्याचे सांगितले.
माही हुशार व होतकरू असली तरी शाळेत येणे बंद झाल्याने शाळेकडूनही तिची विचारपूस होऊ लागली. त्यावेळी शुभांगणा यांनी माहीच्या ऑपरेशनबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या पुरी यांना माहिती दिली. मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी महिला सेवा मंडळाचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लगेच निर्णय घेऊन माहीच्या ऑपरेशनसाठी मदतीची तयारी दर्शविली. आज माहीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, ती काही दिवसांतच पूर्ण बरी होऊन सामान्यपणे चालू, फिरु शकेल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
सर... तुमच्यामुळेच मी उभी राहू शकले!
माहीच्या पायाच्या ऑपरेशनबद्दल पवन रुईया व रश्मी रुईया यांना कळल्याबरोबर त्यांनी लागलीच नागपूरला जाऊन डॉक्टरांची भेट घेतली. खर्चाबद्दल विचारपूस करुन दीड लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी ऑपरेशन केले. सध्या माही चिल्ड्रेन ऑर्थोपेडिक केअर युनिट नागपूर येथे ॲडमीट आहे. आता थोडीफार चालायला लागली. नुकतीच रुईया दाम्पत्याने रुग्णालयात जाऊन माहीची भेट घेतली असता ‘सर... आज तुमच्यामुळेच मी स्वत:च्या पायावर उभी राहू शकले’, अशी भावना व्यक्त केली. तिची आई शुभांगणा यांनीही रुईया दाम्पत्यासह उपाध्यक्ष गीता गुप्ता, मुख्याध्यापक पुरी, वर्गशिक्षिका लोखंडे यांचे आभार मानले.
शिक्षिकांनी आयुष्यभरासाठी विद्यार्थिनीला उभे केले
- एरवी शिक्षक आपल्या अध्यापनाच्या आणि अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवित असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांवर अहोरात्र मेहनतही घेतात. परंतु वर्ध्यातील शिक्षिकांनी एका अधू विद्यार्थिनीला आयुष्यभरासाठी आपल्या पायावर उभे राहण्यास, सक्षम बनविण्यात मोलाची भूमिका बजावली.
- नियमित शाळेत येणाऱ्या माहीला अचानक शाळा सोडावी लागल्याने मुख्याध्यापक संध्या पुरी व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी सातत्याने तिची विचारपूस केली. ऑपरेशनबद्दल माहिती मिळताच या दोन्ही शिक्षिकांनी याची माहिती संस्थेचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांना दिली. त्यांनी अर्थसहाय्य करुन मोठा आधार दिल्याने आता माही आयुष्यभराकरिता आपल्या पायावर उभी राहू शकते. माहीचा पुढील फिजिओथेरपी, स्लिट कॅपलर व औषधांचा खर्चही रुईया दाम्पत्याने उचलला आहे. त्यामुळे या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.