मुसळधार पावसामुळे खरडली शेतजमीन
By Admin | Published: July 6, 2016 02:30 AM2016-07-06T02:30:28+5:302016-07-06T02:30:28+5:30
गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
बांध फुटल्याने शेती जलमय : सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे नुकसान
वर्धा/पिंपळखुटा : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल दोन तास ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळल्याने सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले. या पावसामुळे ८५ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळखुटा परिसरातील शेतजमिनी खरडून गेल्या. कित्येक शेतांचे बंधारे फुटल्याने बियाणे अंकुरण्यापूर्वीच मातीखाली दबले. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. वाढोणा येथे पर्जन्यमापक यंत्र आहे. तेथे ३६ मिली पावसाची नोंद घेण्यात आली; पण पिंपळखुटा परिसरात यापेक्षा अधिक पाऊस झाला. तलाठी रजेवर व कृषी सहायक प्रशिक्षणाला गेल्याने शेतकऱ्यांना वेळेत तक्रार देता आली नाही. प्रत्येक शेतात पाणी साचले आहे. तरोडा येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. श्यामसुंदर भुतडा यांची विहीर पावसामुळे खचली आहे. वाहतूकही विस्कळीत झाली होती. तरोडा येथे विठ्ठल वाघ यांच्या घराच्या भिंती पडल्या. तरोडा येथे तुकाराम थूल यांच्या शेतात नाल्याचा पूर गेल्याने शेत खरडून गेले. सुरेश ढोले, मंदा गायकवाड, ज्ञानेश्वर धपाट, ओमप्रकाश भुतडा, होरेश्वर कालोकार, गोलू शाहू, भास्कर जाधव यांच्याही शेताचे नुकसान झाले. मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची कृषी व महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)