नगराध्यक्षावर अविश्वासाचे सावट
By admin | Published: October 29, 2015 02:18 AM2015-10-29T02:18:01+5:302015-10-29T02:18:01+5:30
स्थानिक नगर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्यावर २७ पैकी २५ नगरसेवकांनी अविश्वास दाखविला.
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर : सर्व २५ नगरसेवक सहलीसाठी रवाना
हिंगणघाट : स्थानिक नगर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्यावर २७ पैकी २५ नगरसेवकांनी अविश्वास दाखविला. जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. शिवाय सदर सर्व नगरसेवक महाराष्ट्र दर्शनासाठी रवाना झाले आहेत. यामुळे नगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट गडद झाले आहे.
स्थानिक पालिकेमध्ये ३३ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी सहा नगरसेवकांनी २२ जुलै २०१४ रोजी नगराध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षाच्या विरोधात मतदान केले होते. यामुळे ते सहाही नगरसेवक अपात्र ठरले आहेत. आता या नगर पालिकेकची सदस्यसंख्या २७ राहिली आहे. यात अविश्वासासाठी केवळ २१ हे संख्याबळ असणे आवश्यक आहे. मंगळवारी २४ नगरसेवकांनी तर बुधवारी दुपारी एका नगरसेवकाने अविश्वास प्रस्तावावार साक्षरी केली. यामुळे कापसे यांच्या विरोधात २५ नगरसेवक एकत्र आल्याचे दिसते.
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पंढरीनाथ कापसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे पालिकेत भाजपाचे संख्याबळ चार होऊन २७ जुलै २०१४ रोजी कापसे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.
सद्यस्थितीत नगर परिषदेमध्ये भाजपाचे चार नगरसेवक असून यापैकी संगीता साठे व शारदा पटेल यांच्या अविश्वास प्रस्तावावर साक्षऱ्या आहेत. भाजपाचे बादल रेवते हे कापसे यांच्या बाजूने असल्याचे दिसून येते.
सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेच्या सर्वच सहा नगर सेवकांसह भाजपाच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा, काँग्रेसच्या पाच, मनसेच्या एका तसेच अपक्ष विठ्ठल गुळघाने, अशोक पराते यांच्यासह एकूण २५ नगरसेवकांनी साक्षऱ्या केल्या आहेत.
नगराध्यक्ष कापसे यांच्यावर स्वपक्षीयांसोबतच मित्र पक्षाच्या नगरसेवकांचीही प्रचंड नाराजी आहे. न.प. सदस्यांच्या हद्दीतील कामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गत सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या धुसफसीचा स्फोट होऊन नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाचे सुचक नगरसेवक विठ्ठल गुळघाणे तर अनुमोदक शंकर मोहमारे आहे. हा प्रस्ताव सादर करताना सूचक व अनुमोदकासह न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नगरसेवक अशोक पराते आणि बालाजी गहोलद उपस्थित होते.
आता यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून काय निर्णय घेतला जातो, नगराध्यक्ष पायउतार होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)