विविधतेत एकतेमुळेच भारतीय लोकशाही मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:01 PM2019-05-10T22:01:42+5:302019-05-10T22:02:24+5:30
भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी स्व.बापुराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख होते तर उपाध्यक्ष सतीश राऊत, सचिव प्रकाश ढांगे, संचालक डॉ. किशोर अहेर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आवटे पुढे म्हणाले, भारतीय संविधान भारताच्या लोकांनी स्वत:ला अर्पण केले आहे. इतर देशात लोकांना मतदानाचा हक्क मागावा लागल. मात्र, आपल्या देशात अगदी सुरूवातीपासून मतदानाचा हक्क मिळाला. सर्वसामान्य व्यक्ती हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. शिवाय त्याचा विविधता सर्वसमावेशकता या जीवनमुल्यावर विश्वास आहे. नेहरू, गांधी, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीने लोकशाही अधिक प्रगल्भ झाली आहे. विविधतेने नटलेल्या या देशात आम्ही भारताचे लोक सौख्याने नांदत आहे. हेच लोकशाहीचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंतची वाटचाल तरूणांना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेही सरतेशेवटी त्यांनी सांगितले.
प्रा. सुरेश देशमुख यांनी स्व. दाआजींच्या कतृर्त्वावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागात शिक्षणाची पायमुळे रूजवून आज ग्रामीण जीवन उंचावण्याचे महत्वाचे कार्य दाआजींनी केल्याचे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यात सर्व सत्तास्थाने काबीज करून काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केल्याचे ते त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व अतिथीचा परिचय प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी करून दिला.
स्व. बापुरावजी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होळपळत असताना शासनाला ३२५ कोटींची मदत करून दिल्याचा उजाळा करून दिला.
ग्रामीण भागात जोपर्यंत शिक्षणाचे व्दार उघडल्या जाणार नाही. तोपर्यंत विकास साध्य होणार नाही, हा दृष्टीकोन जोपासुन त्यांनी जिल्ह्यातील खेड्यागावात शाळा सुरू केल्याचे देशमुख म्हणाले. संचालन प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सतीश राऊत यांनी मानले.