जलपर्णीमुळे नदी-नाले झाले अरूंद
By Admin | Published: March 16, 2017 12:46 AM2017-03-16T00:46:08+5:302017-03-16T00:46:08+5:30
खरांगणा (गोडे) व वघाळा या दोन गावांच्या मध्यातून धाम नदी वाहते. नदीचे पात्र लव्हाळे, वनस्पती आणि बेशरमच्या झाडांनी व्यापले आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका : नदीच्या स्वच्छतेची मागणी
सेवाग्राम : खरांगणा (गोडे) व वघाळा या दोन गावांच्या मध्यातून धाम नदी वाहते. नदीचे पात्र लव्हाळे, वनस्पती आणि बेशरमच्या झाडांनी व्यापले आहे. खोलीकरण व स्वच्छता कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यासह नागरिक उपस्थित करीत आहेत.
नद्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असून याच पाण्याच्या भरवशावर मानवी वस्ती व प्रगती साधली आहे. सकाळी व सायंकाळी नद्यांवर गर्दी राहत होती. सर्व व्यवहार व कामकाज नद्यांच्या माध्यमातून होत होते. नव्या शेती तंत्रज्ञानामुळे शेतीत प्रगती झाली. नवीन पीक व जोमात उत्पादने होऊ लागली. नदीतील जलवाहीनीमुळे हरितक्रांती झाली. बारमाही पिकांमुळे शेतकरी, मजुरांना फायदा होऊ लागला.
सोबतच पावसाचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले. जमिनीवर पडणारे पाणी नदी, नाल्यातून वाहून जाऊ लागले. वैभवशाली परंपरा जोपासणारी धाम नदी आता उथळ झाली. शेवाळ, जल वनस्पती आणि दोन्ही काठावर बेशरमने अतिक्रमण केले आहे. परिणामी, नदीचे पात्र अरूंद झाले. ठिकठिकाणी खोलगट व उथळ भाग झाल्याने यालाच नदी म्हणावे काय, असा प्रश्न उन्हाळ्यात उपस्थित होतो. या नदीतील खोल भागात अल्प पाणी राहत असल्याने डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. पुरेसे पाणीच नसल्याने ऊसाचे पीक धोक्यात येते.
पाणी शुद्ध राहणे गरजेचे आहे; पण याच नदीत मूर्ती विसर्जन, निर्माल्य, पत्रावळी, द्रोण आदी टाकून ते प्रदूषित करण्यात येते. पुलावरून निर्माल्य टाकणारे दररोजच दृष्टीस पडतात. यात शिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. धामनदीचे पात्र या ठिकाणी मोठे असून कमी पाण्यामुळे प्रवाह थांबला आहे. रोज येथे मासेमारी करून उपजिविका करणारे आहे. या साहित्यामुळे मात्र पाणी दूषित होत असून याचा परिणाम माशांवर होतो. उन्हाळ्यात नदीपात्र डबक्यासारखे होत असल्याने मासेमारीचा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या नद्या खोलीकरण व स्वच्छता उपक्रमांतर्गत धाम नदीचे पात्र खोल करणे गरजेचे आहे. जलस्त्रोतावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. शासनाने धामनदीचे खोलीकरण व रूंदीकरण करावे, अशी मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)