जादूटोण्यावरून उफाळलेला वाद संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:34 AM2017-07-20T00:34:51+5:302017-07-20T00:34:51+5:30
शेजारच्या व्यक्तीने जादूटोणा केल्याने पुतणी आजारी पडली, असे सांगणाऱ्या एका मांत्रिकामुळे हिंगणी येथील
अंनिसच्या तक्रारीवरून पोलिसांनी केली मध्यस्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेजारच्या व्यक्तीने जादूटोणा केल्याने पुतणी आजारी पडली, असे सांगणाऱ्या एका मांत्रिकामुळे हिंगणी येथील नागोसे आणि चरडे या दोन कुटुंबात मागील काही दिवसांपासून कडाक्याचे भांडण सुरू होते. दरम्यान, जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने नागोसे कुटुंबाने महाराष्ट्र अंनिसकडे मदत मागीतली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत प्रकरण दाखल केल्यानंतर ठाणेदारांच्या मध्यस्थीने कथित जादूटोण्याचा वाद संपुष्टात आणल्याने नागोसे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
हिंगणी येथील देवनगर वॉर्डातील रहिवासी गंगाराम नागोसे हे मागील ३२ वर्षांपासून गावातच छोटासा किराणा दुकान चालवितात. ते दिव्यांग आहेत. त्यांच्या घराशेजारी तेजा चरडे यांचे कुटुंब राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चरडे यांची पुतणी आजारी पडली. औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी यवतमाळ येथील मांत्रिकाचा सल्ला घेतला. शेजारी राहणाऱ्या नागोसे यांनीच करणी केल्याने पुतणी आजारी पडली, अशी माहिती त्या मांत्रिकाने दिल्याने दोन्ही कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे माहितीपत्रकात नमूद केले आहे. तेजा चरडे यांनी आजारी पडलेल्या पुतणीला बरे कर; अन्यथा जीवे मारू, अशी धमकी देऊन नागोसे यांच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेमुळे नागोसे कुटुंबामध्ये दहशत निर्माण झाली. परिणामी, नागोसे यांनी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्याकडे सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर जिल्हा बुबावाजी संघर्ष विभागाचे कार्यवाह भरत कोकावार यांना सोबत घेऊन रविवारी सेलू ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संजय बोठे यांनी हिंगणी येथील तेजा चरडे यांना लगेच ठाण्यात बोलावले. सुरकार यांनी जादूटोणा अस्तित्वात नसल्याचे समजावून सांगितले. ठाणेदारांनीही दोन्ही कुटुंबांचे गैरसमज दुर करून गुण्यागोविंदाने राहण्याची सूचना केली. तेजा चरडे यांना खात्री पटल्याने सर्वांसमक्ष माफी मागुन जादूटोण्याचा आरोप करणार नसल्याचे शपथपत्र लिहून दिले.