पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचा पचका
By admin | Published: July 28, 2016 12:34 AM2016-07-28T00:34:56+5:302016-07-28T00:37:05+5:30
आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे.
प्रशासनाची उदासीनता : सहा महिन्यांचे काम नऊ महिन्यांवर जाण्याची शक्यता
वर्धा : आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर डायव्हर्जन दिल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसामुळे पाणी साचून रस्त्याला खड्डे पडले आहे. पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहतुकीचा पचका हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
या मार्गावर असलेल्या मुख्य नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम विभागामार्फत सदर काम करण्यात येत आहे. याकरिता सहा महिन्यांचा कालावधी प्रस्तावित होता. बांधकाम करण्याकरिता आर्वी मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे.
सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. जडवाहणे, प्रवासी वाहतूक तसेच शाळकरी मुले, कर्मचारी यांची सतत ये-जा सुरू असते. या मार्गावर मंगल कार्यालये गर्दी जास्त असते. एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण जात आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. पुलाच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात जागा नाही. त्यामुळे या भागात पाणी साचते. सातत्याने पाणी साचल्यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे येथे पाणी साचून तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डे पडले असून रस्ता उखडला आहे. मध्यंतरी बीएसएनएलने केबल टाकण्याचे काम केले. याकरिता रस्ता खोदला. मात्र केबल नाली व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्यावर मधोमध उंचवटे तयार झाले. वाहन काढणे जिकरीचे झाले आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
नागरिक बांधकाम विभागावर धडकले
नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडल्याने आधीच वाहतुकीचा पचका झाला आहे. त्यातच मंगळवारी रात्री तासभर झालेल्या दमदार पावसामुळे आसपासच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यात अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील महिला बुधवारी बांधकाम विभागावर धडकल्या. यावेळी त्यांनी पुलाचेर बांधकाम त्वरित करावे अशी मागणी लावून धरली. हा प्रकार नित्याचाच झाल्याचेही महिलांनी सांगितले.
बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. पण पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. कामाचे स्वरूप पाहता याला आणखी तीन महिन्यांचा कालावधी ंलागू शकतो. त्यामुळे सहा ऐवजी नऊ महिन्यात सदर काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. काम लवकर पूर्ण करण्याचाच प्रयत्न आहे.
- एम. डब्यू. धांदे, अभियंता.