इमारत हस्तांतरणात बांधकामचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:40 AM2017-07-23T00:40:50+5:302017-07-23T00:40:50+5:30
रुग्णालय, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामांना शासनाने मंजुरी दिली.
पाच वर्षांपासून प्रतीक्षा कायम : कामे पूर्ण होऊनही बांधकाम विभागाची दिरंगाई
प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रुग्णालय, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामांना शासनाने मंजुरी दिली. यावरून सुमारे ५ वर्षांपूर्वी बांधकामांना प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांकडून ही कामे केली जात आहेत; पण पाच वर्षांनंतरही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
सामान्य नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी म्हणून शासनाने रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तथा डॉक्टर, कर्मचाऱ्यांकरिता क्वार्टर बांधकाम करण्यास मंजुरी दिली. या कामांना मुबलक निधीही पुरविण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही कामे आणि तत्सम निधी वर्ग करण्यात आला. बांधकाम विभागाने कंत्राटदारांकडून सदर कामांचा श्रीगणेशा केला. या बाबीला तब्बल ५ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप कामे पूर्ण झाली नाहीत. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात देवळी, समुद्रपूर, आष्टी येथील रुग्णालय इमारत, देवळी, वर्धा, आष्टी, सेलू येथील कर्मचारी निवासस्थान ही कामे सुरू करण्यात आली होती. यातील देवळी येथील रुग्णालय इमारत पूर्ण करून हस्तांतरित करण्यात आली; पण आष्टी येथील रुग्णालय इमारत अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. सेलू, आष्टी येथील कर्मचारी निवासस्थानांची कामे अद्याप शिल्लक आहेत. आष्टी येथील रुग्णालयाचे मागील वर्षी नोटीस मिळाल्याने बांधकाम विभागाने लगबगीने हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला; पण पाणी, विद्युत आदी सुविधाच उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे आरोग्य यंत्रणेकडून ही इमारत ताब्यात घेण्यास नकार दिला. एक वर्ष लोटूनही ही क्षुल्लक कामे अद्याप करण्यात आलेली नाही. सेलू येथील रुग्णालय डॉक्टर, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अद्याप हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिसऱ्या माळ्यावर आॅपरेशन थिएटरचे बांधकाम करण्यात आले आहे; पण येथे लिफ्टच बसविण्यात आलेली नाही. परिणामी, ही वास्तूही अद्याप हस्तांरित होऊ शकलेली नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या क्वार्टरची कामेही मुदतीत करण्यात आली नाहीत. कामे दर्जेदार होत असल्यास विलंब कळू शकतो; पण निकृष्ट बांधकामे होत असताना त्यांनाही विलंब लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा तसेच तालुका स्थळावर असलेल्या रुग्णालय इमारत, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांची कामे अपूर्ण असल्याने रुग्णसेवा करताना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक कर्मचाऱ्यांना अन्यत्र भाडेतत्वावर राहून गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत अनेकदा जि.प. आरोग्य विभाग तथा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला; पण अद्याप कार्यवाही होत नसल्याचेच दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष देत ही कामे जलदगतीने पूर्ण करीत इमारती हस्तांतरित करणे गरजेचे आहे.
आष्टीच्या रुग्णालय इमारतीचे भिजत घोंगडे
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता प्रारंभी जागाच मिळत नव्हती. अनेक आरोप, आक्षेपानंतर जागा देत बांधकाम सुरू करण्यात आले. याला पाच वर्षे लोटली असताना ही इमारत पूर्ण करण्यात आली नाही. परिणामी, तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आष्टी तालुका असून नगर पंचायत असताना शहर तथा तालुक्यातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्जाचीच रुग्णसेवा मिळत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.