धाम नदी पात्रात सर्वत्र घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:05 AM2018-03-31T00:05:02+5:302018-03-31T00:05:02+5:30
आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी पवनारला ओळख. मात्र, येथील धाम नदीच्या पात्राला सध्या अस्वच्छतेचा विळखा आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती जमा झाली आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी पवनारला ओळख. मात्र, येथील धाम नदीच्या पात्राला सध्या अस्वच्छतेचा विळखा आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती जमा झाली आहे. शिवाय दुर्गंधीयुक्त पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने धाम नदी स्वच्छ करण्याची मोहीम नाम फाऊंडेशनच्या मदतीने हाती घेतली असली तरी पवनारपर्यंत अजूनही हे काम पोहोचलेले नाही. त्यामुळे नदीपात्र घाणीने भरून आहे.
पवनार आश्रमच्या परिसरातून धाम नदी वाहते. या धाम नदीवर बंधारा बांधून पाणी रोखून धरण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात आता पाणी शिल्लक राहिलेले नाही. शिवाय नदीजवळूनच राज्यमार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतच मातीचा भराव टाकण्यात आला आहे. दुर्गा व गणेश मूर्तींचे विसर्जन या नदीपात्रात करण्यात आले. अनेक प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती नदीपात्रात अजूनही पडून आहेत. त्या पाण्यात मुरलेल्या नाहीत. नंदी घाटाच्या भागाकडून असलेल्या घाटावर सर्वत्र चिखल व चिंधी कापड पडून आहेत. येथे पाण्याचे डबके नदीपात्रात तयार झाले आहे. तेथे विविध साहित्य कूजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तेथे अनेकजण पिंडदान व दशक्रियेच्या विधीसाठी येतात; पण नदीपात्रात पाणी नसल्याने या धार्मिक विधीतही अडचण निर्माण होत आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने अनेकांना बोरवेलच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी पवनारच्या ग्रामस्थांची आहे.
पवनार विकास आराखड्याचे काम रखडले
आश्रमच्या बाजूकडून दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेले पवनार विकास आराखड्यातील काम सध्या थांबलेले आहे. आश्रममधील विश्वस्तांनी या कामांवर काही आक्षेप घेतल्यामुळे हे काम थांबविण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे एकूणच धाम नदीच्या स्वच्छतेबाबत व विकासाबाबतची मोठी अनास्था दिसून येत आहे. धाम नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण पाण्यावर शेवाळ जमा झाले आहे. तसेच नदीमधील दगडांच्या मध्येही घाण पाणी जमा होऊन आहे.