भाजी बाजाराला मोफत बांधकामाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:48 AM2018-03-13T00:48:37+5:302018-03-13T00:48:37+5:30
बजाज चौक परिसरात असलेल्या भाजी बाजार अनेक काळापासून आहे त्याच स्थितीत आहे. बाजाराचा अधिकार असलेल्या या जागेवर नवा अद्यावत बाजार बनविण्याची योजना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने अंमलात आणली. परंतु हे काम पूर्णत्वास जाण्यापुर्वी त्याला मोफत बांधकामाचा खोडा पडला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : बजाज चौक परिसरात असलेल्या भाजी बाजार अनेक काळापासून आहे त्याच स्थितीत आहे. बाजाराचा अधिकार असलेल्या या जागेवर नवा अद्यावत बाजार बनविण्याची योजना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने अंमलात आणली. परंतु हे काम पूर्णत्वास जाण्यापुर्वी त्याला मोफत बांधकामाचा खोडा पडला आहे.
या भाजीबाजाराचा कायापालट करण्याकरिता बाजार समितीकडून प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याकरिता बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी बाहेर जिल्ह्यात जात बाजाराची पाहणीही केली. त्यातून बाजाराचे मॉडेल ठरविण्यात आले. त्याचा प्रस्ताव तयार झाला. यावर सुमारे १० कोटी रुपये खर्चही प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रस्ताव परवानगीकरिता सादर करताच शासनाचे नियम बदलल्याचे समोर आले. हे नियम ऐकून बाजार समितीचे पदाधिकारीही अवाक् झाले.
या नव्या नियमानुसार शासनाच्या जागेवर व्यावसायिक संकूल उभे करताना एकूण जागेच्या ४० टक्के जागा पालिकेला देणे बंधनकारक केले. शिवाय शिल्लक असलेल्या जागेवर होणाºया बांधकामाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६० टक्के बांधकाम पालिकेला दिलेल्या ४० टक्के जागेवर करून देणे बंधनकारक केले आहे. बांधकामानंतर या इमारतीची मालकी बाजार समितीची नाही तर नगर परिषदेची राहणार आहे. नगर परिषद ही जागा भाड्यानेही देवू शकते अथवा त्यांना वापरायची असल्याचे ते तसेही करू शकते. या नियमामुळे बाजार समिती चिंतेत पडल्याने या बांधकामाच्या प्रस्तावाला सध्या बे्रक लागला आहे. ही समस्या नेमकी केव्हा मार्गी लागेल हे सांगणे सध्या तरी कठीण झाले आहे.
१२,७४५ चौरस मिटर जागा
बजाज चौक परिसरात असलेला हा भाजी बाजार एकूण १२ हजार ७४५ चौरस मिटर परिसरात विस्तारीत आहे. या जागेवर मोठा अद्यावत बाजार उभारण्याचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीने सादर केला. यातील ४० टक्के जागा देण्यास समितीचा नकार नाही, पण ज्या जागेवर बांधकाम करून देण्याच त्याचा नकार असल्याचे समोर आले आहे. एवढी मोठी रक्कम बांधकामावर खर्च करून त्यातून कुठलाही लाभ होणार नसल्याने समितीकडून याला नकार देण्यात येत असल्याची माहिती आहे.
नवा भाजी बाजार सध्या नाहीच
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वर्धा शहरात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजी विक्रीकरिता येतात. त्यांना बाजारात आल्यानंतर लिलावाकरिता एका ठिकाणी नाही तर बाजारभर भटकावे लागते. शिवाय नागरिकांनाही खरेदीकरिता येथे असलेल्या कच्च्या आणि दगड टाकून ठेवलेल्या रस्त्यांवरून चालून खरेदी करावी लागते. यामुळे या बाजाराचा विकास होण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला कधी बाजार समितीत असलेल्या सदस्यांचे वाद आणि कधी पैशाची अडचण आडवी आली. तर आता नियम आडवा आल्याने नवा बाजार सध्या नाही, असेच चित्र निर्माण झाले आहे. यावर काय निर्णय होतो याकडे शहरवासीयांच्या नजरा आहेत.
बाजार समितीकडून बजाज चौक परिसरात नवीन बाजार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नाला ४० टक्के जागा आणि ५० टक्के मोफत बांधकामाची अट आडवी आली आहे. यामुळे सध्या बाजाराच्या निर्मितीवर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात बाजार समितीचे सभापती व सदस्यांत चर्चा सुरू आहे. यावर काय तोडगा निघतो याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.