कचऱ्यामुळे वस्तीला डम्पिंग यार्डचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:33 AM2018-04-19T00:33:30+5:302018-04-19T00:33:30+5:30

नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे.

Dumping Yard Style | कचऱ्यामुळे वस्तीला डम्पिंग यार्डचे स्वरूप

कचऱ्यामुळे वस्तीला डम्पिंग यार्डचे स्वरूप

Next
ठळक मुद्देनागरिक दुर्गंधीने बेजार : स्वच्छ हिंगणघाटचा बोजवारा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

हेमंत चंदनखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. या कचºयाच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
सध्या शहरातील कचरा विकास शाळेजवळ टाकला जात आहे. कचरा टाकण्याचा प्रकार नित्याचा असल्याने येथे कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट गुरे फिरत असून त्यांच्या माध्यमातून कचरा इतरत्र पसरत आहे. नगर परिषदेची या डम्पिंग यार्डला मान्यता नसल्याची माहिती आहे. असे असले तरी शहरातील लोकांनी प्लास्टिक कचरा, सडक्या वस्तू, मेलेली जनावरे, शेण, ओला-सुखा कचरा पोत्यात भरून जुन्या व बंद असलेल्या पडक्या विकास शाळेच्या जागेत सर्रास टाकणे सुरू केले आहे. ते मैदान पूर्णत: कचऱ्याने भरले गेले असून तेथील हलका कचरा प्लास्टिक सारख्या वस्तू हवेने रस्त्यावर येत आहे. काही कचरा जनावरांनी पसरविल्यानेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त पसरलेला आहे.
या कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी बाहेर पडत असल्याने त्या रस्त्यावरून जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. याच परिसरात शहरातील एक मोठे हनुमान मंदिर आहे. तेथे भाविकांची गर्दी असते. या नागरिकांना या कचºयाच्या ढिगाऱ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय लागूनच असलेल्या वसंत विहार आणि विनोद भवन परिसरातील नागरिकांचे या दुर्गंधीमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक समस्या भेडसावत असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. असे असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेने ही समस्या गांभीर्याने घेण्याची मागणी आहे.
स्वच्छता अभियानातच वाढला कचरा
शासनाच्या सूचनेनुसार ‘स्वच्छ अभियान’ शहरभर पाळल्या गेले. या अभियानाचा शेवट झाला तरी हा भाग यातून सुटला असल्याचेच दिसत आहे. उलट या अभियानाच्या काळात या भागात कचरा अधिकच वाढल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. कुणीही यावं आणि येथे कचरा टाकून मोकळे व्हावे, असा प्रकार सध्या येथे सुरू आहे. लगतच्या परिसरातील अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानातील कचरा पोत्यात जमा करून येथे टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी असल्यामुळे अनेकांनी हा एक जवळचा मार्ग शोधला असल्याचे दिसून येत आहे; पण याचा त्रास येथील नागरिकांना होतो, याचा विचार कुणीही करण्यास तयार नाही. या प्रकारामुळे विनोद भवन आणि वसंत विहारातील रहिवासी शहराचे नागरिक नाहीत काय, असाही सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
आठवड्यातून दोन वेळाच येते घंटागाडी
शहरातील ही एक मोठी लोकवस्ती आहे. यामुळे येथील नागरिकांना सेवा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना या भागात आठवड्यातून केवळ दोनच दिवस घंटागाडी येत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. यातून पालिकेच्या स्वच्छता अभियानाची मर्यादा स्पष्ट होते. एकीकडे स्वच्छता अभियानाचा जोरदार वाजागाजा केला जात असताना दुसरीकडे असा कचऱ्याचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभा होत आहे. प्लास्टिक बंदी असताना सर्वत्र प्लास्टिकचा कचरा दिसतो. यामुळे पालिकेच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Dumping Yard Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा