बुरांडे ले-आऊट परिसरात घाणीचे साम्राज्य

By Admin | Published: March 1, 2015 01:25 AM2015-03-01T01:25:07+5:302015-03-01T01:25:07+5:30

शहरालगतच्या आलोडी ग्रा़पं़ अंतर्गत येणाऱ्या बुरांडे ले-आऊटमधील देशमुख वाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Dunky empire in the Burande Lay-out area | बुरांडे ले-आऊट परिसरात घाणीचे साम्राज्य

बुरांडे ले-आऊट परिसरात घाणीचे साम्राज्य

googlenewsNext

वर्धा - शहरालगतच्या आलोडी ग्रा़पं़ अंतर्गत येणाऱ्या बुरांडे ले-आऊटमधील देशमुख वाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र सांडपाण्याचे डबके साचले असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे़ शिवाय घुस, उंदरांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांची घरे पोखरली जात आहेत़ याबाबत अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ देशमुख वाडी परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत त्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़
कित्येक दिवसांपूर्वी बुरांडे ले-आऊट विकसित करण्यात आले आहे़ या ले आऊटमध्ये अनेक मोठी घरे आहेत़ येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वराहांसह मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे़ नाल्या नसल्याने घरातील सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग राहिला नाही़ यामुळे सांडपाणी एका ठिकाणी जमा होऊन डबके साचले आहे़ या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यात वराहांचा मुक्त संचार असल्याने येथे नेहमीच घाण साचलेली असते. शिवाय परिसरातील नागरिकांना रस्तेही उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत़ डांबरी रस्ते या भागातील नागरिकांना पाहावयासही मिळाले नाहीत़ काही प्रमाणात रस्त्यांचीह निर्मिती झाली; पण ते मातीकाम केलेलेच दिसतात़ यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते़ या रस्त्याने वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत़ याबाबत नागरिकांनी अनेकदा ग्रा़पं़ प्रशासनाला तोंडी सूचना दिल्यात; पण काही उपयोग झाला नाही. सध्या परिसरात साथीच्या आजारांची लागण होत असल्याचे दिसते़ याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत; पण कुठलही कारवाई करण्यात आली नाही़ शिवाय स्वच्छता अभियानही राबविण्यात आले नाही़ ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

साथीच्या आजारांची नागरिकांत भीती
कित्येक वर्षांपूर्वी विकसित झालेल्या बुरांडे ले-आऊट परिसरातील देशमुख वाडी परिसर अद्यापही मागासलेलाच आहे़ या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधाही पुरविण्यात आलेल्या नाहीत़ रस्ते नाही, नाल्या नाही आणि पथदिवेही बसविण्यात आलेले नाही़ यामुळे तेथील नागरिकांना खितपत जगावे लागत आहे़ नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते़ शिवाय अनेक ठिकाणी गटारे साचली आहेत़ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या आजारांची लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार, सांडपाण्याचे डबके यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ ग्रा़पं़ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़

पथदिव्यांचाही अभावच
या परिसरात काही ठिकाणी विजेचे खांब गाडण्यात आले आहेत; पण त्यावर अद्यापही पथदिवे लावण्यात आले नाही़ ज्या खांबांवर पथदिवे लावण्यात आले, ते फोडले जात असल्याचे तेथील नागरिक सांगतात. यामुळे बुरांडे ले-आऊट परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो़ यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका वाढला आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाने पथदिव्यांची कायम व्यवस्था करणेही गरजेचे झाले आहे़

वराहांसह गुरांचा मुक्त संचार
बुरांडे ले-आऊट देशमुख वाडी परिसरात अनेक ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहे़ शिवाय अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसते़ या सांडपाण्यामध्ये वराहांचा मुक्तसंचार असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर गुरांचीही गर्दी दिसून येते़ यामुळे परिसराला घाणीचा विळखा बसला आहे़
सध्या सर्वत्र स्वाईन फ्ल्यू ची दहशत आहेत़ या आजाराची लागण वराहांपासून होते़ या रोगाचे सर्वाधिक जंतू वराहांमध्ये दिसून येतात़ या भागात वराहांचीच संख्या अधिक असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे़ सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रा़पं़ ने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे़

Web Title: Dunky empire in the Burande Lay-out area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.