नागपूर-मुंबई दु्रतगती मार्गाची दैना
By admin | Published: July 15, 2016 02:27 AM2016-07-15T02:27:55+5:302016-07-15T02:27:55+5:30
नागपूर-मुंबई या दोन महानगरातील अंतर कमी वेळात पार करता यावे म्हणून द्रुतगती मार्ग तयार करण्यात येत आहे.
वाहन धारकांना मनस्ताप : खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण
पुलगाव : नागपूर-मुंबई या दोन महानगरातील अंतर कमी वेळात पार करता यावे म्हणून द्रुतगती मार्ग तयार करण्यात येत आहे. याकरिता जवळपास ३८५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र या द्रुतगती मार्गाची एवढी दैनावस्था पाहता हा मार्ग मृत्युला निमंत्रण देणारा ठरत आहे.
या द्रुतगती मार्गाची निर्मिती करुन आता विस्तारीकरण सुरू आहे. चौपदरीकरण तसेच कुठे रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई प्रवास वाहनाने प्रवास करणे सोयीचे व वेळेची बचत करणारे ठरणार आहे. मात्र ही स्वप्ने पूर्णत्वास येणे तर दुरच नादुरुस्त रस्त्याची डागडुजी केलेली नाही.
जवळपास १५ वर्षापूर्वी या द्रुतगती मार्गाचे काम एका कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आले. त्यावेळी या दुपदरी मार्गासाठी रस्त्याच्या बाजुच्या शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. अनेक प्रवासी निवारेही तोडण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातून द्रुतगती मार्ग जात असल्याने प्रवासी व वाहनधारकांत आनंद व्यक्त होत होता. परंतु हा मार्ग तयार होवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर काही महिन्यातच उखडला. या मार्गाचे अंतरंग दिसू लागले. नागपूर, वर्धा, पुलगाव दरम्यान हा द्रुतगती मार्गाची हालत खुपच खस्ता झाली आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहने चालकांची चांगलीच ओरड सुरू झाली आहे. काही भागात या मार्गाची डागडूजी करण्यात आली. मात्र तीदेखील थातुर-मातुर. हा द्रुतगती मार्ग रस्ते विकास महामंडळा अंतर्गत येत असल्यामुळे याकडे सार्वजनिकि बांधकाम विभागही फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे तक्रार कुठे करावी, असा प्रश्न भेडसावत आहे.
या मार्गात नागपूर ते पुलगाव दरम्यान लहान मोठे अनेक खड्डे आहे. शिवाय रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून या मार्गावर अनेक अपघात होतात. यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. परंतु प्रशासनाला मात्र अद्याप जाग आली नाही. लोकप्रतिनिधी, शासनकर्ते याकडे कानाडोळा करतात.
या द्रुतगती मार्गाशेजारच्या ग्रामस्थांना शहरवासियांना हा मार्ग चौपदरी होणार आपल्या गावाला महत्त्व येवून मोठे उद्योगधंदे येतील असे वाटणे स्वाभाविकच आहे. परंतु पुलगाव परिसरात या मार्गाची खुपच दैनावस्था पाहायला मिळते. जवाहर कॉलनी, कॅम्प, रेल्वे क्रॉसिंग, कवठा, बोरगाव(धांदे) इत्यादी भागात या रस्त्यात काही ठिकाणी खाचखड्ड्यांचे साम्राज्य आहे. निम्न वर्धा कालव्यावरील कॅम्प जवळील पूल उखडला आहे. सिमेंटातून गिट्टी बाहेर पडत आहे.
वर्धा नदीवर पुलापासून ते बोरगाव(धांदे) दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी अनेक अपघात घडतात. परंतु पुलगाव ते बोरगाव(धांदे) दरम्यान या मार्गावर अपघात प्रवणस्थळ असल्याचे किंवा अन्य कुठहीली सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या मार्गातील खाचा-खळगे न दिसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन नाहक बळी जातो.
यापुढे कुठल्याही मोठ्या अपघाताची प्रतीक्षा न करता संबंधित विभागाने या मार्गाकडे लक्ष देत डागडुजी करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांची आहे. पावसाळ्यात रस्ता उखडला असून गिट्टी बाहेर पडल्याने वाहन घसरतात. या मार्गाने जडवाहतूक असल्याने डागडुजी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
सुकळी(बाई) ते जामणी मार्गावर खड्ड्यांची मालिका
आकोली : सुकळी (बाई) ते जामनी मार्गावर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. या मार्गावर अपघात नित्याचे झाले असून बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचा विसर पडला आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यावरील डांबर व गिट्टी उखडले आहे. शिवाय खड्डे पडले असून सततच्या पावसामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने व वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहन घसरुन अपघात होतात. सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावर साखर कारखाना व पॉवर कंपनी असुन जडवाहनांची मोठी वर्दळ असते. शिवाय काटोल, कोंढाळी, कारंजा येथे जाण्याकरिता हा मार्ग सोईचआ असल्याने बसेस व खासगी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे खड्डे बुजविणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
नंदोरी-कोरा मार्गाची दैना
कोरा - नंदोरी-कोरा मार्गावरील वासी नजीक रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू भरण्यात आल्या नाही. त्यामुळे अपघातसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडीकरण न केल्यामुळे एक ते दोन फुटापर्यंत दरी पडली आहे. खड्डे पडले असल्याने दोन्ही बाजूने वाहने आली असता अपघात होण्याचा धोका आहे. दुसरे वाहन काढताना एक वाहन रस्त्याखाली उतरविले तर खड्ड्यात जाण्याचा धोका आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना रस्त्याच्या कडा भरणे गरजेचे आहे. नारायणपूर ते कोरा रस्त्यावर खड्डे पडले आहे.(वार्ताहर)
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
वर्धा- पावसाळा सुरू झाला तरीही रस्त्याची डागडुजी न केल्याने शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहे. यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या उदासीन प्रवृत्तीमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खोलगट खड्ड्यांमुळे वाहन धारकांना धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आम आदमी पार्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद व नॅशनल हायवे विभागाला निवेदन देऊन रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजवून जनतेला होणाऱ्या त्रासापासून वाचवावे, अशी मागणी केली आहे. यावेळी किसान आघाडी जिल्हा प्रभारी अजित इंगोले, प्रमोद भोमले, प्रमोद भोयर, रविंद्र साहु, नितीन झाडे, मंगेश शेंडे, मयुर राऊत, अरुण महाबुधे, बाबुजी ढगे आदी उपस्थित होते.