कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:57 PM2020-08-15T13:57:06+5:302020-08-15T13:57:24+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा  73 व्या वर्धापन दिनाचे  मुख्य शासकिय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले.

During the Corona period, farmers were inspired to fight in adverse conditions - Sunil Kedar | कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार

googlenewsNext

वर्धा: कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला होता,मात्र शेतक-यांनी शेतीची  कामे करून देशाच्या जनतेची भूक भागविण्याचे मोलाचे कार्य या काळात केले. शेतकरी, शेतमजूर या संक्रमणाच्या काळातही शेतात राबत होते. विपरित परिस्थितही लढण्याची प्रेरणा शेतक-यांच्या कामातून आपल्या मिळते.  कोरोनाची काळजी घेऊन आपले काम करता येते हे शेतक-यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास,  क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्याचा  73 व्या वर्धापन दिनाचे  मुख्य शासकिय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. 

शेतक-यांनी कोरोनाच्या संकटकाळातही 70 टक्के पेरणी पूर्ण केली आहे. कोणत्याही संकटाची तमा न बाळगता कामाप्रती  प्रामाणिक असलेल्या शेतक-यांचे आभार मानून पालकमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. कोरोनाच्या काळात कोणीही गरीब, शेतमजूर, कामगार उपाशी राहणार नाही याची काळजी  घेतली. अन्न सुरक्षा कायदयाअंतर्गत शिधा पत्रिका वितरीत करण्याचा उपक्रम या काळात घेतला.  महसूल आणि जिल्हा परिषदेच्या  क्षेत्रिय स्तरावर काम करणा-या कर्मचा-यांनी 15 दिवसात 9 हजार शिधापत्रिका नव्याने तयार करुन  वितरीत केल्यात. यामुळे  अनेकांच्या घरी  चूल पेटली. यासाठी काम करणा-या कर्मचारी व अधिका-यांचे त्यांनी अभिनंदन केले.  

शेतक-यांच्यासाठी राज्यशासनाने अनेक चांगले निर्णय घेतले. लॉकडाऊनमुळे अनेक शेतक-यांच्या घरात पडून असलेला कापूस आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी  कापूस खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कापूस खरेदी सर्वप्रथम संपविणारा वर्धा हा  पहिला जिल्हा ठरला याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करुन कापूस खरेदीसाठी  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्या सोबतच जिनिंग प्रेसींग, भारतीय कापूस महामंडळ व  बाजार समित्यांचे अभिनंदन केले. वर्धा जिल्हयाने इतर जिल्हयाचाही कापूस खरेदी करुन तेथील शेतक-यांना आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

लॉकडाऊनच्या काळात  राज्यात आर्थिक मंदी असतांना आणि  पिक विमा योजना यावर्षी ऐच्छिक असतानां सुध्दा जिल्हयातील 25 हजार शेतक-यांच्या पिकाचा  विमा उतरविण्याचे काम कृषि विभागाने केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे  पिकाचे नुकसान होऊन शेतक-यांना बसणारा आर्थिक फटका यामुळे टाळता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

प्रगतीचा मार्ग गतीमान करण्याची  संधी  महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्ताने या जिल्हयाला उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचं सोनं करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासन आणि जिल्हयातील नागरिकांना केले. यावेळी  जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा  सत्कार पालकमंत्र्यांनी  केला. 

पालकमंत्र्याचे हस्ते जिल्हयातील शहिद जवान हरी लाखे, अमित टिपले, संजयकुमार चौधरी यांच्या वीर माता व पत्नी ,  पोलिस विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेले  पालिस निरिक्षक निलेश ब्राम्हणे, महिला कर्मचारी सत्यभामा लोणारे, परवेज खान, दर्शना वानखेडे,  शाहीन महेबुब,  दयाल धवने यांचा उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय प्राज्ञाशोध परीक्षेत जिल्हयात प्रथम आलेल्या  साईराम पी.व्ही. गोपाल पैला, रितेश डाहाके,  हर्ष खासबागे  व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  काम करणा-या कोरोना योदध्यांचा यामध्ये डॉ. सचिन ओम्बासे,  डॉ. बसवराज तेली,  डॉ. पुरुषोत्तम मडावी, डॉ. अजय डवले,  मनोजकुमार शहा,या अधिका-याचा तर  महात्मा  गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन  गंगणे,  दत्ता मेघे  आर्युविज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. अजय मुळे, आशा वर्कस  दिपाली चांडोळे व  जिल्हयातील सामाजिक संस्थांचा प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार करण्यात आला.     

याप्रसंगी वर्धा जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या सुनियोजित कार्यपध्दतीवर आधारित 'वर्धा मॉडेल'  या माहितीपटाची निर्मिती जिल्हा माहिती कार्यालयाने  केली असून माहितीपटाच्या सिडीचे विमोचन  पालकमंत्र्याचे हस्ते करण्यात आले.  कोरोनामुळे जिल्हयातील मुलांचे शिक्षण निरंतर सुरु राहावे यासाठी  जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या 'ई-विद्या' या संकेतस्थळाचे आणि ॲपचे  लोकार्पण  पालकमंत्री यांनी संगणकाची कळ दाबून केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका  रोटकर यांनी केले. यावेळी  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: During the Corona period, farmers were inspired to fight in adverse conditions - Sunil Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.