पोषण आहाराच्या तांदळात सोंडे अन् अळ्या
By admin | Published: July 9, 2017 12:35 AM2017-07-09T00:35:38+5:302017-07-09T00:35:38+5:30
शासनाने मध्यान्ह भोजनाच्या नावावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना सुरू केली.
पिपरी (मेघे) येथील प्रकार : जि.प. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाने मध्यान्ह भोजनाच्या नावावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना सुरू केली. यातून कुपोषणावर मात करण्याचे स्वप्न पाहिले; पण यात पोषक धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचे समोर आले आहे. पिपरी (मेघे) येथील जि.प. प्राथमिक शाळेत पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या व सोंडे आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांतील मुलांचे पोषण व्हावे, त्यांना सकस आहार पुरविता यावा म्हणून शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली; पण त्यातील अन्नधान्याकडे लक्ष दिले जात नसल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. सध्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदूळ पुरविला जातो. हा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून येत आहे. यावरून शासन चिमुकल्यांचे अळ्या, सोंडे असलेल्या धान्यातून पोषण करीत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पिपरी (मेघे) येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये शासनाच्या पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या तांदळामध्ये अळ्या आणि सोंडे असल्याचे समोर आले आहे. याच तांदळापासून तयार केलेली खिचडी चिमुकल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. जि.प. शाळांमध्ये गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. मुले गरीब घरची असली तरी त्यांचे पालक त्यांना चांगले अन्न देण्याचा प्रयत्न करीत असतात; पण शाळेमध्ये अळ्या, सोंडेयुक्त तांदळाची खिचडी दिली जात असल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. जि.प. शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे. यावरून शाळेत दिला जाणारा पोषण आहार खरोखरच पोषक आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जि.प. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.