पावसाळ्यात होतेय नालेसफाई
By admin | Published: June 16, 2017 01:19 AM2017-06-16T01:19:47+5:302017-06-16T01:19:47+5:30
पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही,
जिल्ह्यातील पालिकांचा प्रकार : वर्धेतही मजुरांकडून काढला जातोय गाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाला करावे लागते. जिल्ह्यातील बहुतांश नगर पंचायत, नगर पालिकांनी ते नियोजन केलेही; पण कामे मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर केली जात असल्याचे दिसते. परिणामी, नाल्यांचा उपसा करताना मजुरांनाच तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
वर्धा नगर परिषदेने शहरातील मोठे नाले, लोकवस्तीतील नाल्यांच्या सफाईचे नियोजन केले होते. यातून पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ होणे गरजेचे होते; पण आज जून महिन्याची १५ तारीख आली असताना शहरातील नाले साफच झालेले नाहीत. सध्या गोंड प्लॉट परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची मजुरांकडून सफाई करून घेतली जात आहे. मुख्य मार्गावर असलेल्या पुलाखालून मजूर मागील दोन दिवसांपासून गाळ उपसण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात बुधवारी मजुरांना नाल्यात पुलाखाली साप आढळून आला. फावडे लागल्याने जखमी सापामुळे मजुरांचीही गाळाचा उपसा करण्याची हिंमत होत नव्हती. पावसाळा सुरू झाला असून पावसाचे तथा सांडपाणी या नाल्यातून दररोज वाहते. दरवर्षी हा नाला जेसीबीच्या माध्यमातून साफ केला जात होता तर पुलाखालील भाग मजुरांकडून साफ करून घेतला जात होता; पण यंदा जेसीबी दिसून आला नाही. मजुरांकडून नालेसफाईची कामे करून घेतली जात असल्याचे पाहावयास मिळाले. शहरातील अन्य नाल्यांची सफाई अद्याप शिल्लक आहे. मग, गल्ली-बोळातील नाल्यांची सफाई आणि कचरा निर्मूलन ही कामे कधी होणार, हा प्रश्नच आहे.
पुलगाव शहरातील मुख्य नाल्यातही गाळ व कचरा
पुलगाव शहरातून वाहणारा मुख्य नाला काही दिवसांपूर्वी साफ करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी नाला अद्यापही गाळाने बुजून असल्याचे दिसून येते. हा नाला गांधीनगर भागात फुटलेल्या अवस्थेत आहे. शनिमंदिर परिसरात नाल्यामध्ये गाळ व कचरा साचला आहे. शिवाय नाचणगाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भागात कचरा आणि गाळाचे साम्राज्य दिसते. शहरातील इतर नाल्यांचीही तिच स्थिती आहे. परिणामी, पावसाळ्यात नाला ओसंडून वाहणार असून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.