चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:11+5:30

कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत.

E-pass at the check post | चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा

चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा

Next
ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमेवरील वास्तव : विना विचारपूस करताच दिली जातेय जिल्ह्यात एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे; पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई-पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दादाकडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना साधी विचारपूसही केली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.
कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आली आहे, तर ई-पास नसलेल्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून परत पाठविणे क्रमप्राप्त असताना चेकपोस्टवरील कर्मचारी ये-जा करणाऱ्यांची साधी नोंदही घेत नसल्याचे दिसून आले.

खडका व कौंडण्यपुरात चेकपोस्ट नाही
देऊरवाडा-कौंडण्यपूर मार्गाने आणि शिरपूर-जळगाव- परसोडा-बेलोरा या मार्गाने अमरावती जिल्ह्यात जाता येते. पण, तेथे अद्यापही चेकपोस्ट नाही.
सेलडोह शिवारात लावले बॅरिगेट्स 
वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह येथे पोलिसांकडून बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. या ठिकाणी वर्धा व नागपूर जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांच्या  वाहनांची तपासणी केली जात आहे.

विदेशी दारूचीही होतेय आयात
जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण, सध्या संचारबंदीच्या काळात शेजारच्या जिल्ह्यांमधून छुप्या पद्धतीने विदेशी दारूची आयात दारूविक्रेते करीत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी झाल्यास दारूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे. परंतु, पोलीस प्रशासन त्यासाठी सकारात्मक नसल्याचे दिसते.

वर्धेला चार जिल्ह्यांचा वेढा

वर्धा जिल्ह्याला नागपूर, अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ  जिल्ह्यांची सीमा लागून आहे. त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले असले तरी या ठिकाणी अनेकांचे आवागमन बिनधास्त सुरू आहे.
ई-पासच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सिमेवर काही ठिकाणी तात्पूर्ती पोलीस चौकी तयार करून तेथे पोलीस आणि काही अधिकारी तैनात करण्यात आले आहे; पण तेही जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना साधी विचारपूस करीत नाहीत.  
जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून मागील वर्षी जिल्हाबंदी दरम्यान आर्वी तालुक्यात सात, आष्टी पाच तर  कारजा तालुक्यात तीन ठिकाणी चेकपोस्ट होते. तर जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात जाणाऱ्या चोरवाटा तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात बंद करण्यात आल्या होत्या.
 

मध्य प्रदेशात जाणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट नाहीच
आष्टी तालुक्यातील द्रुगवाडा मार्गे अमरावती जिल्हा होत मध्य प्रदेशात जाता येते. परंतु, या मार्गावर चेकपोस्टच नाही.  केवळ एका गृहरक्षकावर जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे कुठल्याही वाहनाची तपासणी होत नाही.
 

 

Web Title: E-pass at the check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.