भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:00 AM2018-02-24T00:00:09+5:302018-02-24T00:00:09+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई केली आहे. याबाबतचा लिलाव २० फेब्रुवारीला ई-टेंडरींग पद्धतीने झाला.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई केली आहे. याबाबतचा लिलाव २० फेब्रुवारीला ई-टेंडरींग पद्धतीने झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला या भंगार विक्रीच्या लिलावामुळे नवीन साहित्य खरेदीसाठी मदत होणार असल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळ कुठेही मागे पडू नये म्हणून दिवसेंदिवस नवनवीन प्रयोग केले जात आहेत. वातानुकूलीत असलेली शिवशाही बस सेवा हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगितले जाते. एकूणच बदलत्या युगाप्रमाणे रापम योग्य सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जून्या काही बसेस, टायर, बॅटरी व रापमच्या कुठल्याही कामात न येणारे इतर साहित्य गत काही महिन्यांपासून रापमच्या विभागीय कार्यशाळेत धुळ खात होते. ते विक्री करण्याचे निश्चित करीत त्याबाबत ई-निविदा प्रक्रियेद्वारे रितसर आवेदन मागविण्यात आले. सदर भंगार विक्री प्रक्रियेत रापमच्या वर्धा विभागाने एकूण १२५ वस्तू विक्रीकरिता ठेवल्या होत्या. त्यापैकी १२३ वस्तूंची विक्री झाली आहे.
या भंगार विक्रीतून रापमच्या वर्धा विभागाला ८५ लाख रुपये येणे अपेक्षीत होते;पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगाराला ९० लाख ६१ हजार ६७८ रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. अपेक्षेपेक्षा सुमारे साडे पाच लाख जादाचेच भंगार विक्रीतून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला प्राप्त झाले आहे. भंगार विक्रीतून प्राप्त रक्कम नवीन साहित्य खरेदीसाठी फायद्याची ठरणार आहे.
बसेससह टायर व बॅटºयांच्या विक्रीतून सर्वाधिक मिळकत
रापमच्या वर्धा विभागाने त्यांच्या कुठल्याही कामात न येणाºया १० मोठ्या बसेस, ५ छोट्या बसेस, १ हजार ५५० टायर, ९०० बॅटऱ्या विक्रीतून सर्वाधिक मिळकत प्राप्त केली आहे.
पुणे येथील एका कंत्राटदाराच्या माध्यमातून लिलाव घडवून आल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भंगार कमी असले तरी यंदाच्या वर्षी भंगाराला चांगले दर मिळाले आहे.
बॅटरी मागे ३०० तर टायर मागे ५५ रुपये मिळविले जास्त
प्रत्येक बॅटरीला ३ हजार २०० तर प्रत्येक टायरला ३०० रुपये रापमच्या वर्धा विभागाला मिळणे अपेक्षीत होते. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेदरम्यान प्रत्येक बॅटरी मागे ३०० तर टायर मागे ५५ रुपये जास्त मिळाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे नवीन साहित्य खरेदीकरण्यासाठी मदत होणार असल्याने भंगार विक्री प्रक्रिया रापमच्या वर्धा विभागासाठी फायद्याची ठरली आहे.
भंगार विक्रीतून मोठी कमाई रापमच्या वर्धा विभागाची झाली आहे. नवीन साहित्य मिळविण्यासाठी ही मदतगार ठरणार आहे.
- राजेश अडोकार,
विभाग नियंत्रक,
रा.प.म. वर्धा.