वजन कमी करायचंय ? तर तुम्ही ज्वारीची भाकरी खा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:35 PM2024-07-23T17:35:14+5:302024-07-23T17:39:56+5:30
आहार तज्ज्ञांचे मत : भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामनी): एकेकाळी गरिबांचे भोजन समजल्या जाणाऱ्या ज्वारीच्या भाकरीला आता श्रीमंतीचा थाट चढला आहे. ज्वारीचे पौष्टिक गुणधर्म व आहारात तिचे फायदे किती महत्त्वाचे आहेत हे आता सर्वसामान्यांना कळू लागले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ज्वारीच्या भाकरीला अधिक मागणी वाढली असल्याचे दिसून येते.
बाजरी, ज्वारी, तांदळाची भाकरी अशा धान्याच्या भाकरी केल्या जातात. तर चपाती हा पदार्थ अगदी नाश्त्यामध्येही खाल्ला जातो. गावागावांमध्ये आजही शिळी पिठले भाकरी हा नाश्ता असतो; पण यापैकी वजन कमी करण्यासाठी नक्की काय जास्त उपयोगी ठरेल, याचा तज्ज्ञांच्या मते विचार केल्यास वजन कमी करण्यासाठी पोळीपेक्षा भाकरी हा उत्तम पर्याय आहे. यातही ज्वारीची भाकरी ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. भाकरी खाल्ल्याने लवकर पोट भरते आणि भूकही लवकर लागत नाही. यामध्ये हाय फायबर असल्याने आणि पोटाला चांगला आधार मिळत असल्याने भाकरी वजन कमी करण्यासाठी योग्य ठरते. त्यातही बाजरीची भाकरी आणि त्यासह पालेभाजी हे कॉम्बिनेशन जेवणात असेल तर ते अधिक उत्तम मानले जाते. जिल्ह्यात ज्वारीचा पेरा आता कमी झालेला आहे. यामुळे ज्वारी खरेदी करूनच अनेकजण खातात. विशेष म्हणजे, बऱ्याचदा बाजारात पोळीचे तयार पीठही मिळते. यामध्ये अनेक पोषक तत्त्वे वापरून तयार करण्यात येते; पण भाकरीचे असे होत नाही, हे मात्र तितकेच खरे.
ज्वारीत फायबरचे प्रमाण जास्त
पोळी (चपाती) ही केवळ गव्हापासून तयार होते. तर भाकरीमध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्वारीत फायबरचे प्रमाण अधिक असते.
पचनशक्ती सुधारते, वजन उतरते
पौष्टिक आहारासाठी आणि डाएटमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ही भाकरी उपयुक्त ठरतात. ज्वारीच्या भाकरीमुळे पचनशक्ती सुधारते, याशिवाय वजनही कमी होते.
जिल्ह्यात ज्वारीचा पेरा किती ?
- पूर्वी जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून ज्वारीची पेरणी केली जात होती. आता मात्र फारशी पेरणी केली जात नाही.
- रब्बी हंगामात काही शेतकरी ज्वारीची पेरणी करतात; मात्र हा पेराही कमीच आहे.
ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी शेतामध्ये ज्वारीचा पेरा भरपूर प्रमाणात होता; मात्र दिवसेंदिवस हा पेरा घटला आहे. पेरा घटला असून उत्पादन कमी झाल्यामुळे ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट आला आहे. हल्ली गव्हाच्या तुलनेत ज्वारी महाग आहे.
हॉटेलातही भाकरीलाच मागणी
मागील काही वर्षामध्ये शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये ज्वारीच्या भाकरीलाच मागणी अधिक असल्याचे दिसून येते. ज्वारीच्या भाकरीची थाळी महागात जाते. आता झुणका भाकरही ६० रुपयांवर पोहोचली आहे.
स्ट्रोक, मधुमेहाचा धोका कमी
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी भाकरी अधिक गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना नेहमीच भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.
धान्य दर (प्रतिकिलो)
गहू ३० ते ४०
बाजरी ३५ ते ४५
ज्वारी ३५ ते ५०
आहारतज्ज्ञ म्हणतात...
"सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शारीरिक हालचाल, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आहाराचे प्रमाणही संतुलित असणे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा वापर केल्यास फायद्याचे आहे. ज्वारीमध्ये पोषक तत्त्व, प्रथिने, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. पचनसंस्था सुधारण्याचे काम करते."
- डॉ. श्रावण साखरकर, देवळी.
व्यापारी म्हणतात
"पूर्वीच्या काळी जिल्ह्याचे मुख्य पीक म्हणून ज्यारीची ओळख होती आणि ज्वारीची भाकरी मुख्य आहार होता. मात्र, अलीकडच्या काळात ज्वारीचा पेरा घटला, परिणामी आवकही घटली; पण आता मात्र ज्वारीला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे."
- रवी कात्रे, व्यावसायिक.