निष्ठावंत डावलल्याने बंडखोरीचे ग्रहण

By admin | Published: February 5, 2017 12:36 AM2017-02-05T00:36:20+5:302017-02-05T00:36:20+5:30

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली.

Eclipse of rebellion due to loyal dowry | निष्ठावंत डावलल्याने बंडखोरीचे ग्रहण

निष्ठावंत डावलल्याने बंडखोरीचे ग्रहण

Next

 हिंगणी गटाकडे जिल्ह्याचे लक्ष : पक्षाच्या उमेदवारांना अंतर्गत आव्हान
प्रफूल लुंगे   सेलू
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली. २ फेब्रुवारीला छाननी झाल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी ४३ तर पंचायत समितीसाठी ६६ उमेदवारी अर्ज कायम आहे. ७ फेब्रुवारीला नामांकन परत घेण्याचा दिवस असून त्यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील, हे चित्र स्पष्ट होईल. सध्या पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. यामुळे पक्षातूनच पक्षातील उमेदवाराला आव्हान देणे सुरू झाले आहे.
हिंगणी जिल्हा परिषद गटातून शेख रशीद अब्दुल (अपक्ष), वसंत परतेकी (अपक्ष), राहुल बोबडे (संभाजी ब्रिगेड एकमेव उमेदवार) यांचे तर झडशी जि.प. गटातून सेलू पं.स. च्या विद्यमान उपसभापती मंजूषा सुनील पारसे (शिवसेना) या चौघांचे नामांकन छाननीमध्ये त्रुटी आढळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केले. तसेच पंचायत समिती सुकळी (स्टे.) गणातून सुनंदा विनोद राऊत (अपक्ष) यांचे नामांकन त्रुटीमुळे रद्द करण्यात आले. राजकीय पक्षांनी नामांकन भरण्याच्या वेळेपर्यंत अनेक निष्ठावंतांना आशेवर ठेवले व ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकाल्याने त्यांनी बंडखोरी केली. याचा काय परिणाम होणार, हे निकालानंतरच कळणार आहे.
केळझर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे माजी पं.स. सदस्य राहिलेले गोविंद घंगारे यांना डावलत राष्ट्रवादी काँग्रेसने मिलिंद हिवलेकर यांना उमेदवारी दिल्याने घंगारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून घंगारे तर अपक्ष म्हणून मिलिंद हिवलेकर निवडणूक लढले होते.
काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले विद्यमान जि.प. सदस्य अरुण उरकांदे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्ष सोडून भाजपाच्या बाजूने गेले होते. आता त्यांनी भाजपाकडून केळझर गटात उमेदवारी मागितली. येथे भाजपाचे कार्यकर्ते विनोद लाखे यांना उमेदवारी मिळाली. यामुळे अरुण उरकांदे यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले आहे.
येळाकेळी जि.प. गटातून सेलू पं.स. च्या भाजपाच्या विद्यमान सभापती मंजूषा दुधबडे यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता; पण दत्ता मेघे यांचे विश्वासू अशोक कलोडे यांच्या पत्नी सोनोली कलोडे यांना भाजपाने उमेदवारी दिली. यामुळे मंजूषा दुधबडे यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली आहे. हमदापूर जि.प. गटातून मोहन गिरी यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार समजले जात होते; पण ऐनवेळी काँग्रेस सोडून भाजपात आलेले सुनील मनोहर शेंडे यांना भाजपाने उमेदवारी दिली. यामुळे व्यथीत झालेल्या मोहन गिरी यांनी अपक्ष निवडूक लढविण्याचा निर्णय घेत बंडाचा झेंडा फडकविला.
खरी कमाल तर झडशी जिल्हा परिषद गणासाठी झाली. येथून महेश मेश्रे यांना भाजपाची उमेदवारी निश्चित मानली जात होती; पण सेलू शहर भाजपाचे अध्यक्ष वरुण जैनेंद्र दप्तरी यांनी हिंगणी जि.प. गणासाठी उमेदवारी मागितली होती.
विद्यमान जि.प. सदस्य राणा (विरेंद्र) रणनवरे यांनी या जागेवर दावा करीत आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून उमेदवारी खेचून आणली. तत्पूर्वी, दप्तरी गटाचे प्रमुख सेलू नगरपंचायतचे नगरसेवक व गटनेते शैलेंद्र दप्तरी यांनी आपला पुतण्या वरुण दप्तरी याला हिंगणी गटातून उमेदवारी देण्यासाठी अट्टाहास केला. एवढेच नव्हे तर उमेदवारी न मिळाल्यास जि.प. व पं.स. च्या सर्व जागा दप्तरी गट अपक्ष लढेल, असा इशाराही दिला होता.
असे झाले तर तालुक्यात भाजपाचे आ.डॉ. पंकज भोयर, राणा रणनवरे व दप्तरी, असे तीन तुकडे होऊन काँग्रेसला फायदा होईल, हे गणित लावून वरुण दप्तरी यांना हिंगणी गटाच्या उमेदवारीचा हेका सोडून देण्यासाठी राजी करण्यात आले आणि झडशी जि.प. गटातून उमेदवारी दिली; पण दप्तरी यांच्या उमेदवारीमुळे महेश मेश्रे या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या. त्यांनी भाजपाशी दोन हात करण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवारी दाखल केली. आता मेश्रे-दप्तरी यांना काँग्रेसचे झडशी ग्रा.पं. चे विद्यमान सरपंच विवेक हळदे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. हळदे कट्टर काँग्रेसी असून वरुण दप्तरी यांच्यासाठी हा मतदार संघ मात्र नवखा राहणार आहे.
तालुकावासियांसह जिल्ह्याचे लक्ष हिंगणी जि.प. गटात माजी जि.प. अध्यक्ष काँगे्रसचे विजय (पप्पू) जयस्वाल व भाजपाचे विद्यमान जि.प. सदस्य राणा रणनवरे यांच्यातील लढतीकडे लागले आहे. येळाकेळी जि.प. गटातून मागील वेळी जयस्वाल यांना रणनवरे यांनी पराभूत केले होते. आता रणनवरे हेच पुन्हा जयस्वाल यांच्याविरुद्ध हिंगणी गटात आहे. जयस्वाल काँग्रेसचे तर रणनवरे भाजपाचे असल्याने काँग्रेस-भाजपा अशी लढत होईल. ही लढत चुरशीची असल्याने जिल्हावासीयांचे याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Eclipse of rebellion due to loyal dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.